डेंग्यू नाही; मात्र काळजी घ्या
By Admin | Updated: November 25, 2014 23:56 IST2014-11-25T23:18:42+5:302014-11-25T23:56:21+5:30
मनपा यंत्रणा सज्ज : डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत घट

डेंग्यू नाही; मात्र काळजी घ्या
कोल्हापूर : पावसाळ्यानंतर दूषित पाण्यापासून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू ताप, चिकनगुन्या यासारखे रोग पसरण्याचा धोका असतो. राज्यभर हिवताप व डेंग्यूसदृश आजारांच्या रुग्णांत वाढ होत असतानाच कोल्हापुरात असे रुग्ण आढळण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. मागील महिन्यात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या ४८ होती, ती आता १० झाली आहे. औषध फवारणीसह साचलेले पाणी वाहते करणे, सर्वेक्षण आदी कामांना महापालिकेने प्राधान्य दिले आहे. डेंग्यू नसला तरी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.
डास प्रतिबंधक औषध फवारणीच्या फेऱ्या सुरू आहेत. मागील वर्षी याच कालावधीत हिवताप व डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. औद्योगिकीकरणाच्या वाढीमुळे सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने जिल्ह्यात परराज्यांतून मजूर आले आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, आदी भागांतील हिवतापग्रस्तांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या परिसरात बराच कालावधी वास्तव्य करून आलेल्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
शहरी भागातही डेंग्यूसदृश आजारांचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. हिवताप रुग्णांची तपासणी पालिकेच्या आरोग्य केंद्रात, तर डेंग्यूची तपासणी ‘सीपीआर’मध्ये करण्याची सोय आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे डॉ. पाटील केले आहे. (प्रतिनिधी)
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
प्रत्येक तापाच्या रुग्णांनी रक्त तपासणी अवश्य करावी.
हिवताप असल्यास त्वरित औषधोपचार घ्यावा.
हिवताप रुग्णांच्या घरातील सर्वांनी रक्ततपासणी करणे गरजेचे आहे.
तुंबलेल्या गटारी वाहत्या करा.
ताप अंगावर काढू नका.
वैद्यकीय उपचार घ्या.
साचलेल्या पाण्यावर
रॉकेल व जळके तेल टाकून डासांची उत्त्पत्ती रोखा.
डबक्यांमध्ये डास अळीभक्षक गप्पी मासे सोडा. जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्या