नाही बेस, तरीही कसे मिळते भरघोस यश..?
By Admin | Updated: April 13, 2015 00:37 IST2015-04-13T00:33:58+5:302015-04-13T00:37:22+5:30
महाडिक यांचा ‘फॉर्म्युला’ : राजकारणात कुठे घुसायचे, कुठे थांबायचे, याची चांगली समज; सत्तेसाठी सगळेच जातात मांडवाखाली

नाही बेस, तरीही कसे मिळते भरघोस यश..?
विश्वास पाटील - कोल्हापूर -0 ‘आप्पा, राजकारणाला काहीतरी वैचारिक बैठक आणि तत्त्वांचे अधिष्ठान असावे लागते,’ असे कुणीतरी आमदार महादेवराव महाडिक यांना सांगितले तर... ते समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर थाप मारून मोठ्याने मनसोक्त हसतील. म्हणतील कसे, ‘अहो, कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक हाच विचार आहे व तेच जिंकण्याचे तत्त्वज्ञान आहे...आणि कसला हवा तुम्हाला बेस...?’
पक्षीय निष्ठा, वैचारिक बांधीलकी, तत्त्वांचे अधिष्ठान असा महाडिक यांच्या राजकारणाला कोणताच पाया नसतानाही त्यांचे राजकारण कसे यशस्वी होते, याचेच कोडे ‘कोल्हापुरी’ जनतेला पडले आहे. तब्बल पंधरा वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचे वर्चस्व राहिले. आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत पुन्हा त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले गेले आहे. सत्तेसाठी बहुतांश नेते कधी ना कधी त्यांच्या मांडवाखालून गेले आहेत.
आजचे कोल्हापूरचे राजकारण पाहता एक नव्हे तर तब्बल तीन महाडिक लोकशाही मार्गाने निवडून येऊनच कोल्हापूरच्या राजकारणात सक्रीय आहेत. चौथ्या महाडिक जिल्हा बँकेच्या उमेदवार आहेत व योग्य वेळी त्या बँकेच्या पदाधिकारी होऊ शकतात. पाचव्या महाडिक यांच्याकडे जिल्हा परिषदेची सूत्रे द्यायची अशी मोर्चेबांधणी त्यांच्या अंगावर पोटनिवडणुकीचा गुलाल पडल्यापासूनच सुरू आहे. या पाचही जणांच्या राजकारणातील यशाचा हुकमी एका आहेत ते अर्थातच महादेवराव महाडिक.
हे सगळे महाडिक यांना जमते कसे असे कोडे कुणालाही पडेल; परंतु त्यात फारसे काहीच अवघड नाही हे खरे असले तरी राजकीय व्यवस्थापनाच्या काही चांगल्या ‘क्वालिटीज’ महाडिक यांच्या नेतृत्वात नक्कीच आहेत हेदेखील नजरेआड करता येत नाही. त्यामुळे तर आज पी. एन. पाटील असोत की सतेज पाटील, मुश्रीफ असोत की विनय कोरे; त्यांच्यापेक्षा ते नक्कीच एक पाऊल पुढे आहेत. सर्वांना सर्व वेळ फसविता येत नाही असे म्हटले जाते; परंतु तेही ‘तत्त्व’ महाडिक यांना लागू होत नाही.
आमदार महाडिक विधान परिषदेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांशी त्यांना कधीच काही देणे-घेणे नसते. विधानपरिषदेत उपस्थित राहून आमदारांनी काही प्रश्न मांडावयाचे असतात हेच त्यांना मान्य होत नाही. कोल्हापूरच्या टोलच्या प्रश्नांत ते ‘दिसायचे’, परंतु ते कुठे, गांधी मैदानाच्या दारातच. हलगी वाजवून मोर्चाचा ‘इव्हेंट’ केला आणि फ्लॅश उडाले की, त्यांच्या दृष्टीने मोर्चा जणू संपलाच! हद्दवाढ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारकापासून रंकाळ्याचे मरण आणि कोल्हापूरचा विकास हे तसे त्यांच्या दृष्टीने तोंडी लावण्याचेही विषय नाहीत. परंतु . तरीही ते सलग अठरा वर्षे ‘आमदार’ आहेत आणि पुढच्या टर्मसाठीची त्यांची बांधबंदिस्ती सुरू झाली आहे.
आता हा विषय का निघाला..? अर्थातच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीमुळे. या निवडणुकीत आमदार महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार विनय कोरे असा सामना रंगला आहे. या लढतीचे खरे स्वरूप ‘महाडिक विरुद्ध सतेज पाटील’ असेच आहे. त्यातीलच एक पोटलढत राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत होत आहे. मजबूत व नाराजी होणार नाही, असे पॅनेल तयार करून महाडिक यांनी अर्धी लढाई जिंकली आहे. महाडिक यांच्या फॉर्म्युल्याच्या जवळ जाईल असेच राजकारण काही प्रमाणात मुश्रीफ यांच्याकडून केले जाते. परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीतील महाडिक-मुश्रीफ यांनी केलेल्या बेरजा व पी. एन.-सतेज पाटील यांनी केलेल्या वजाबाक्या विचारात घेतल्या की हे तंत्र लक्षात येते.
महाडिक हे सगळे कसे ‘मॅनेज’ करू शकतात याचा शोध घेतला तर त्यांना राजकारणात कुठे घुसायचे व कुठे थांबायचे हे चांगले समजते. ‘गोकुळ’मध्ये काही झाले तर त्यांनी ‘पीएन’ यांना दुखावले नाही. त्यांनी हे चांगले जाणले होते की, या निवडणुकीत आपला खरा शत्रू सतेज पाटील हे आहेत. त्यामुळे त्यांना लाभ होईल, असा कोणताच निर्णय घ्यायचा नाही. त्यातून भले ‘पी.एन.’ यांना एखादी जागा जास्त मिळाली तरी त्याची फिकीर नाही. या निवडणुकीत त्यांनी एकाच वेळेला राष्ट्रवादीला बरोबर घेतले. पीएन आणि राष्ट्रवादी यांची कुंडली जमत नसतानाही त्यांना एका मांडवात आणण्याचे काम महाडिक यांचेच. आताच्या त्यांच्या पॅनेलवर नजर टाकल्यास हे लक्षात येईल की, सत्तारूढ पॅनेलमध्ये पीएन यांचे शंभर टक्के नेतृत्व मानणारे चौघेच आहेत. पीएन-महाडिक यांचे नेतृत्व मानणारे चौघे आहेत व महाडिक सांगतील तिथे एका पायावर उभे राहणारे तब्बल दहाजण आहेत. म्हणजे सत्ता आल्यानंतर कुणाचे किती असले तरी सत्तेच्या चाव्या महाडिक यांच्याच पाकिटात असतात.
वारे कोणत्या दिशेने वाहते आहे, याचीही चाहूल त्यांना ‘वातकुकुट यंत्रा’प्रमाणे अगोदरच लागते. त्यामुळेच राज्यात भाजपची सत्ता येणार हे जाणून त्यांनी तगडा विरोधक असताना यश येईल की नाही याची फिकीर न करता मुलग्यास विधानसभेच्या रिंगणात उतरवले. सगळ्या गोष्टी जुळून आल्या व गुलाल मिळून गेला. आता राष्ट्रवादीने त्यांना बाय दिला आहे. बाजार समितीत महाडिक राष्ट्रवादीला बाय देतीलच; शिवाय केडीसीसी मध्येही ते फारसा रस दाखविणार नाहीत. ‘हा महाडिक दिलेल्या शब्दाला जागणारा आहे’, असा तात्त्विक मुलामा त्यासाठी द्यायला ते तयार आहेत; परंतु खरे कारण त्यांना या संस्थांच्या राजकारणात दोन पावले मागे आले तर बिघडत नाही. कारण त्यांना ‘गोकुळ’चीच सत्ता मिळवायची आहे. असे हे आहे सगळे महाडिक यांचे राजकारण... सत्ताकारण !
वैरत्व न ठेवता जुळवून घेण्याची तयारी
महाडिक यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, दीर्घकाळ राजकीय वैरत्व मनात साठवून ठेवण्याची त्यांना सवय नाही. त्यामुळे खुन्नस बाळगून ते राजकारण करीत नाहीत. त्यांनी अनेकांना महापौर केले, अन्य पदे दिली. ती माणसे पदावरून दूर झाल्यावर त्यांच्या उलट गेली तरी त्याची यादी करायच्या फंदात ते कधी पडले नाहीत. दुसरे असे की, त्यांना कोणत्याच पक्षाचे, नेत्याचे, गटाचे वावगे कधीच नसते. मदत हवी असल्यास कुणाचीही पायरी चढण्यास ते मान-सन्मान त्यामध्ये आणत नाहीत. हा महाडिक, अमक्याच्या घराची पायरी चढणार नाही, असे ते फक्त एकदाच गत लोकसभेला सतेज पाटील यांच्याबाबतीत म्हणाले व शेवटपर्यंत त्यावर ते ठाम राहिले. त्यासाठी त्यांची मोजावी लागली तर राजकीय किंमत मोजण्याची तयारी होती.