मनपा शाळांना 'सकारात्मकतेची' गरज
By Admin | Updated: December 2, 2014 23:36 IST2014-12-02T23:24:27+5:302014-12-02T23:36:26+5:30
रोडावणारी संख्या चिंतेचा विषय : दर्जेदार, मोफत सुविधा असताना विद्यार्थी, पालकांची पाठ--महापालिका शाळांचीदुरवस्था :

मनपा शाळांना 'सकारात्मकतेची' गरज
भारत चव्हाण -कोल्हापूर --महानगरपालिकेतील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्यास नेमके कोण जबाबदार ? त्याची कारणं काय आहेत? यावर प्रत्येकवर्षी गांभीर्याने चर्चा होऊन काही ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता होती. सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असताना, काही शाळांचा अपवादवगळता शैक्षणिक दर्जा चांगला असताना विद्यार्थी, पालक या शाळांबाबत नाकं का मुरडतात, याचा शोध घेऊन बदललेल्या काळाप्रमाणे मनपा शाळांनादेखील सकारात्मक दृष्टीने बदलण्याचा प्रयत्न करायला हवा होता; परंतु नेमके याच ठिकाणी प्राथमिक शिक्षण मंडळ आणि लोकप्रतिनिधी कमी पडले. पालकांमधील पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलण्याची जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकवर्गाची होती, पण शिक्षकांनी ती कधीही पार पाडली नाही. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे.
प्राथमिक शिक्षण मंडळाकडे शहरातील अन्य खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळांपेक्षा चांगल्या मजबूत इमारती, खेळाची प्रशस्त मैदाने, अलीकडच्या काळात भरण्यात आलेला प्रशिक्षित शिक्षकवर्ग आहे. या शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी दोन गणवेश दिले जातात. शालेय पुस्तके, वह्या मोफत दिल्या जातात. खासगी शाळांमध्ये फक्त शालेय पुस्तके दिली जातात. खासगी शाळांकडे खेळाची मैदाने नाहीत. ज्या काही सुविधा दिल्या जातात त्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागतात तरीही पालकांचा ओढा वाढत आहे.
मनपा शाळा या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठीच आहेत, असा समज शहरी पालकांचा झालेला आहे. त्यातच अलीकडे आपल्या मुलाने इंग्रजी शाळेतच शिकावे, असा पालकांचा दुराग्रह बनला आहे. या दोन कारणांमुळे मनपा शाळातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. एकेकाळी ६० ते ६५ हजार विद्यार्थी पटसंख्या असलेल्या पालिकेच्या शाळा आता जेमतेम १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत खाली आलेल्या आहेत. वास्तविक, अशाप्रसंगी प्राथमिक शिक्षण मंडळाने काही ठोस निर्णय घेणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही. पालकांचा समज खोडून काढण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे होते.
पटसंख्या कमी होण्याची कारणे
पालकांचा चुकीचा समज : पालिकेच्या शाळा या गोरगरीब, झोपडपट्टीतील मुलांसाठीच असतात असा एक अत्यंत चुकीचा समज पालकवर्गात निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा गरिबांच्या शाळेत आपल्या मुलाला घालणे म्हणजे कमीपणाचे वाटते. या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत हे अशा पालकांना कोणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही.
इंग्रजी शाळांकडे ओढा : काळ बदलला आहे. शिक्षणक्षेत्रात खूप बदल झाला आहे. त्याप्रमाणे आपल्या मुलानेही बदलले पाहिजे, त्यासाठी इंग्रजी शाळेत आपल्या मुलाने शिकावे, असा दुराग्रह झाल्यामुळे आता सामान्य कष्टकरी, रिक्षाचालकांची मुलेही इंग्रजी शाळेत जायला लागली आहेत. त्यामुळे त्याचा पहिला फटका मनपाच्या शाळांना बसला आहे.
शासनाचे चुकीचे धोरण : शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका मनपाच्या शाळांना बसला आहे. अलीकडच्या काळात मागेल त्याला कोठेही शाळा देण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे. जर एक शाळा असेल त्याच्या तीन किलोमीटर परिसराच्या अंतरात दुसरी शाळा दिली जात नव्हती; परंतु आता स्वयंअर्थसाहाय्य, कायम विनाअनुदानित शाळांना परवानगी देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. जिल्ह्यात ३४७ शाळांचे प्रस्ताव सध्या निर्णयप्रक्रियेत आहेत.
चांगल्या तशा वाईट प्रवृत्तीही
मनपा शाळेतील सुमारे साठ टक्के शिक्षकवर्ग हा चांगला आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्याकडून होत आहे. त्यांचे विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे; परंतु काही शिक्षक मात्र अगदी निवांत असतात. एखाद्याची कार्यक्षमता कमी झाली तर त्याचा परिणाम अध्यापनावर होतो. काही शिक्षक घरगुती अडचणी, आर्थिक अडचणीमुळे त्रस्त आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. मूठभर शिक्षकांमुळे शिक्षण मंडळ बदनाम झाले आहे. अशा कामचुकार शिक्षकांवर प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.
खासगी शाळाची मनमानी
पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा यासंबंधी काही निकष आहेत. मनपा शाळांना जसे हे नियम लागू आहेत तसेच ते अन्य खासगी शाळांनाही लागू आहेत; परंतु खासगी शाळा संस्थाचालकांनी हे नियम धाब्यावर बसविले आहेत. काही शाळांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गात १०० ते १२० पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत. पहिली ते चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांवर त्या शाळेतील शिक्षकांना वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे सोडाच तास संपत आला तरी त्याच्यापर्यंत पोहोचताही येत नाही, तरीही पालक अशा गर्दीतील शाळेत आपल्या मुलांना घालण्याचा आग्रह धरतात. अशा अमर्याद प्रवेश देण्याच्या प्रकारामुळे मनपाच्या शाळा ओस पडल्या आहेत.
मनपाच्या शाळांकडे पाहण्याचा सामान्य नागरिकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. या शाळेतील शिक्षक चांगलेच आहेत. गेल्या दहा वर्षांत पालिकेने गुणवत्ताधारक शिक्षकांची भरती केली आहे. विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहेत. चांगल्या सुविधाही दिल्या जातात. खासगी शाळा ‘देखाव्यात’ पुढे तर मनपा शाळा यात कमी पडतात. त्यामुळे पालकवर्गात जागृती करत पूर्वग्रहदूषितपणा दूर केला पाहिजे. -भरत रसाळे,शिक्षक नेते
मनपा शाळांकडे सगळ्यांचाच कानाडोळा झाला आहे. त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असताना ती रोखण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते होत नाहीत. आता विद्यार्थीच नाहीत म्हटल्यावर अशा शाळेत आपल्या मुलाला कोण पाठवेल. तरीही पुढच्या काळात समाजात या शाळांबाबत विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा एक दिवस येथे मनपाची शाळा होती, असे सांगण्याची वेळ येईल. - सुभाष लायकर, शिवाजी पेठ