नितीन मानेंचा अहवाल शासनाकडे पाठविणार
By Admin | Updated: August 7, 2014 00:42 IST2014-08-07T00:34:58+5:302014-08-07T00:42:19+5:30
चौकशी अहवाल सदोषच : जिल्हा परिषद सभेत विजय सूर्यवंशी यांची माहिती

नितीन मानेंचा अहवाल शासनाकडे पाठविणार
कोल्हापूर : तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नितीन माने यांचा चौकशी अहवाल सदोष असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद सभेत दिली. माने यांच्यावर कारवाईचा अधिकार नसल्याने आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्याची ग्वाही त्यांनी दिली; तर उपविभागाकडे भाड्याने घेतलेल्या गाड्यांचे पैसे स्वनिधीतून देण्याची मागणी फेटाळण्यात आली.
नितीन माने यांच्या चौकशीचा अहवाल आपणाकडे आला असून, त्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा शशिकांत खोत व बाजीराव पाटील यांनी विजय सूर्यवंंशी यांना केली. अहवाल विस्तृत आहे. यामध्ये अनेक बाबींवर स्पष्ट अभिप्राय दिलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या गैरव्यवहार झाला का हे तपासावे लागेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यावर हरकत घेत गटविकास अधिकाऱ्यांनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांच्या दिलेल्या यादीत माने यांनी बदल केला आहे. २५ हजार रुपये घेऊन त्यांनी गुण वाढविले. यामध्ये माने यांनी मोठ्या प्रमाणात हात मारल्याचा थेट आरोप करीत चौकशी अधिकारी पी. बी. पाटील यांनी सविस्तर अहवाल दिला आहे. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी खोत यांनी केली. यावर शासनाकडे अहवाल पाठविण्याची ग्वाही सूर्यवंशी यांनी दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकडे कंत्राटी अभियंता पाटोळे यांच्या पुनर्नियुक्तीला पैसे मागितलेल्या पुराव्याचे काय झाले, अशी विचारणा धैर्यशील माने यांनी केली. यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई केल्याने हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने पुराव्यांची शहानिशा करता येत नसल्याचे विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. उपविभागांमार्फत काही अधिकाऱ्यांना भाड्याने गाड्या दिल्या आहेत, त्यांची बिले दिलेली नाहीत, असे निदर्शनास आणून देत ही बिले स्वनिधीतून द्यावीत, अशी मागणी शशिकांत खोत यांनी केली. त्याला काही सदस्यांनी विरोध केल्यानंतर घसारा निधीतून द्या, असे सूचविले. त्याला हरकत घेत घसारा निधीतून बिले देता येत नसल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले. यावेळी विषय समिती सभापती, विभागप्रमुख उपस्थित होते. उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘जय महाराष्ट्र’ म्हणा, आणखी संधी
एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील यांचे अभिनंदन करीत, आमच्या मित्राला संधीचे थोडे दिवस मिळणार आहेत. ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आमच्याकडे आला तर आणखी संधी देऊ, असा चिमटा संजय मंडलिक यांनी काढताच सभागृहात हशा पिकला.