नृसिंहवाडीतील पशुवैद्यकीय दवाखाना ओसाड
By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T20:57:43+5:302014-11-28T00:14:11+5:30
खासगी डॉक्टरांचा आधार : सोईचा अभाव, दवाखाना औरवाडला हलविण्याची मागणी

नृसिंहवाडीतील पशुवैद्यकीय दवाखाना ओसाड
बुबनाळ : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना औरवाड व गौरवाड गावासाठी ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनला आहे. त्यामुळे खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी उमटत असून, होणाऱ्या गैरसोयीमुळे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना औरवाड येथे हलविण्याची मागणी होत आहे.
नृसिंहवाडी येथे या गावासह औरवाड, गौरवाड या तीन गावांसाठी जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याला गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारीच नव्हता, तर १० वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीला शिपाईही नाही, अशी अवस्था या दवाखान्याची असताना आॅगस्ट २०१४ पासून या दवाखान्यास वैद्यकीय अधिकारी मिळाला; पण लसीकरणाच्या अथवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांना दवाखाना उघडायला वेळ नाही, अशा अवस्थेत हा दवाखाना सापडला आहे.
दरम्यान, या दोन गावांतील परिसरात दुधाळ जनावरांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे. शेतीस जोडधंदा म्हणून या भागातील शेतकरी दोन-तीन जनावरे बाळगतो. सध्या दुधास चांगला दर मिळत असल्याने घर खर्च चालूून चार पैसे शिल्लक राहत असल्याने दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा बनला आहे. शेतकरी आपल्यापेक्षा जनावरांना जिवापाड जपत आहेत; पण त्यांच्या आजारपणात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविना जनावरे कित्येकदा मृत्यूच्या दारात बांधावी लागत आहेत. नृसिंहवाडी शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना पूर्वी ग्रामपंचायतीच्या जागेवर उभा होता. नंतरच्या काळात दवाखाना भाड्याच्या जागेत हलविण्यात आला. या ठिकाणी जनावरे तपासणीसाठी खोडा नाही. जनावरे बांधण्यासाठी बाहेर जागा नसल्यामुळे या दवाखान्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. बहुतांशवेळा शेतकरी डॉक्टरांनाच आपल्या जनावरांच्या गोठ्याकडे नेऊ लागले आहेत. दवाखान्यात पाण्याचा, विजेच्या सोयीचा अभाव आहे. याबाबत नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडे दुसऱ्या जागेची मागणी वेळोवेळी करूनही या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे योग्य उपचाराअभावी अनेक जनावरे वांझ पडत आहेत. शासनाच्या लाभदायी योजनांपासून दूध उत्पादक शेतकरी वंचित राहत आहे. पर्यायी खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असल्याने औरवाड येथे हा दवाखाना हलविण्याची मागणी परिसरातून होत आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना देण्यात येणाऱ्या कृत्रिम रेतन लसीची किंमत २२ रुपये आहे. मात्र, खासगी डॉक्टरांकडून ती शंभर रुपये आकारली जाते. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.