निराधार योजनेची पेन्शन दोन हजार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:29+5:302021-02-09T04:27:29+5:30
कागल : भाजपची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ हसन मुश्रीफ यांचे हे मतदार आहेत, म्हणून कागल ...

निराधार योजनेची पेन्शन दोन हजार करणार
कागल : भाजपची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केवळ हसन मुश्रीफ यांचे हे मतदार आहेत, म्हणून कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या हजारो लाभार्थींची चौकशी लावली. साडेचार हजार लोकांची पेन्शन बंद केली. या गोरगरिबांचा शाप लागल्यानेच त्यांची सत्ता गेली. आम्ही येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही बंद केलेली पेन्शन पूर्ववत सुरू करू. तसेच मासिक एक हजाराची पेन्शन दोन हजार रुपये केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.
कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेतील नव्याने मंजूर झालेल्या १९० लाभार्थींना मंजुरी पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम शाहू हाॅलमध्ये झाला, त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे, मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, संचालक इगल प्रभावळकर, दिग्विजय पाटील, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रवीण काळबर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी समितीचे अध्यक्ष भैया माने आणि सर्व सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.
स्वागत सदाशिवराव तुकान यांनी केले. प्रास्ताविक भाषणात भैया माने म्हणाले की, गेल्या पाच वर्षात केवळ चारशे ते पाचशे जणाना नव्याने पेन्शन सुरू झाली होती. आता दोन महिन्यात आम्ही दोनशे नवीन प्रकरणे मंजूर करीत आहोत.
आभार प्रवीण सोनुले यांनी मानले.
चौकट
● श्रावण बाळाचा त्रास
वीरेंद्र मंडलिक म्हणाले की 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात आम्ही मते मागायला गेलो की, या योजनेचे लाभार्थी, आम्हाला मुश्रीफांनी पेन्शन सुरू केली आहे असे सांगत. श्रावणबाळाचा त्रास तेव्हा आम्हाला झाला, तसेच पाच वर्षे सत्ता असूनही आमची प्रकरणे मंजूर झाली नाहीत.
फोटो कॅप्शन
कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन लाभार्थींना पेन्शन मंजुरीचे वाटप मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वीरेंद्र मंडलिक ,भैया माने, प्रकाश गाडेकर आदी उपस्थित होते.