निपाणी पालिकेची सभा अभूतपूर्व गोंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:31+5:302021-07-14T04:29:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. नगरसेवकांनी टेबलवर चढून एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी ...

निपाणी पालिकेची सभा अभूतपूर्व गोंधळात
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. नगरसेवकांनी टेबलवर चढून एकमेकांविरोधात टीकाटिप्पणी केली तर, विरोधक नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन गोंधळ घातला. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. मुन्सिपल हायस्कूलचे हस्तांतरण हा विषय वाचताच सत्ताधारी नगरसेवकांनी मंजुरी दिली तर, विरोधकांनी यावर आक्षेप घेत नगराध्यक्ष याच्या खुर्चीजवळ जात गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी सभागृहात जोरदार वाद घातला. अखेर चर्चा न करताच सर्व विषयांना सभागृहाने मंजुरी दिली.
निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी बोलावण्यात आले होती. सभेत २६ विषयांवर चर्चा होणार होती. सभेच्या सुरवातीला आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनी स्वागत केले. नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्य नीता बागडे व सभापती सदाम नगारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेला सुरवात झाली. यानंतर लागलीच गोंधळाला सुरवात झाली. विषय वाचताना नगरसेवक विलास गाडीवडर हे सूचना करण्यासाठी उभे राहतात सत्ताधारी नगरसेवकांनी गोंधळाला सुरवात केली. मुन्सिपल हायस्कूलचे हस्तांतरण करणे हा विषय वाचताच सत्ताधारी नगरसेवकांनी लगेच मंजुरीच्या घोषणा दिल्या. यानंतर मात्र विरोधक नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या खुर्चीजवळ जात मुन्सिपाल हस्तांतरणास विरोध केला. यानंतर सत्ताधारी व विरोधक यांच्यात बाचाबाची झाली. काही नगरसेवकांनी तर वैयक्तिक टीकाटिपण्णी करत सभागृहात गोंधळ घातला. सत्ताधारी गटातील नगरसेवक दत्ता जोत्रे, संतोष सांगावकर व सभापती नगारजी यांनी टेबलवर उभे राहत विरोध दर्शवला. सत्ताधारी, विरोधकांच्या गोंधळात सर्व विषयांची चर्चा न करताच मंजुरी देत सभा संपविण्यात आली. विशेष म्हणजे सभेपुढील २६ पैकी एकही विषयावर सभागृहात चर्चा झाली नाही.
माफीवरून सभेला पूर्णविराम
विरोधक नगरसेवकांनी अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जात अध्यक्षांचा व सभागृहाचा अपमान केला. यामुळे विरोधी नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी सताधारी नगरसेवकांनी केली, पण विरोधकांनी याला दाद न दिल्याने झालेल्या गोंधळात सभा संपविण्यात आली.
नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यांनी मत मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली; पण गोंधळ थांबला नाही. या सभेला नगरसेवक संजय सांगावकर, अनिस मुल्ला, राजू गुंदेशा, आशा तवळे, सोनल कोठडीया, दीपक पाटील, अनिता पठाडे यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकरी उपस्थित होते.
१३ निपाणी गोंधळ
फोटो
निपाणी : नगराध्यक्षांच्या खुर्चीसमोर सर्वच नगरसेवकांनी अभुतपूर्ण गोंधळ घातला. मुन्सिपल हायस्कूल हस्तांतरण विषयावरून हा गोंधळ झाला.