नऊ साखर व्यापाऱ्यांना पावणेतीन कोटींचा गंडा
By Admin | Updated: March 7, 2015 01:02 IST2015-03-07T00:57:37+5:302015-03-07T01:02:13+5:30
केदार मंत्री याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा

नऊ साखर व्यापाऱ्यांना पावणेतीन कोटींचा गंडा
कोल्हापूर : साखर पुरवितो असे सांगून नऊ साखर व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी साखर पुरवठादार संशयित केदार मंत्री (रा. फ्लॅट नंबर ५०३, सी विंग, रॉयल अॅस्टॉनिया, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिसांत शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद हंसराज छागालाल जैन (रा. २९/३६३, माने कॉलनी, सम्राटनगर) यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित केदार मंत्री याने शहरातील विविध व्यापाऱ्यांकडून २९ जानेवारी २०१५ ते आजअखेर या कालावधीत नऊ साखर व्यापाऱ्यांकडून स्वत:च्या बँक खात्यामध्ये दोन कोटी ८२ लाख तीन हजार ३०० रुपये भरून घेतले. त्यानंतर जैन यांच्यासह सर्व साखर व्यापाऱ्यांनी मंत्री याच्याकडे साखरेची मागणी केली असता त्याने ‘सांगली व सातारा जिल्ह्यांतील दोन साखर कारखान्यांना साखर पुरविली आहे; त्यामुळे तुम्हाला नंतर साखर पुरवितो, असे सांगितले.
दरम्यान, हंसराज जैन याच्या मुलाने गतमहिन्यात मंत्री याला फोन लावला; पण मंत्री याचा मोबाईल बंद होता. त्यानंतर सर्व व्यापारी न्यू पॅलेस येथील केदार मंत्री याच्या दुकानात गेले; पण दुकानही बंद होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हंसराज जैन यांच्यासह नऊ साखर व्यापारी शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याजवळ आले. व्यापाऱ्यांनी चर्चा करून अखेर संशयित केदार मंत्री याच्याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी केदार मंत्री याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम ४२० (फसवणूक) व ४०६ (विश्वास संपादन करणे) नुसार गुन्हा दाखल झाला.(प्रतिनिधी)