सतेज, महाडिकांसह नऊजणांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: December 10, 2015 01:28 IST2015-12-10T01:17:38+5:302015-12-10T01:28:34+5:30
विधान परिषद निवडणूक : प्रकाश आवाडे, विजय सूर्यवंशी यांचेही अर्ज; आज छाननी, आतापर्यंत २१ अर्ज दाखल

सतेज, महाडिकांसह नऊजणांचे अर्ज दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बुधवारी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विद्यमान आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह नऊ जणांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले.
विधान परिषद निवडणुकीसाठी २७ डिसेंबरला मतदान, तर ३० डिसेंबरला मतमोजणी होत आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज विक्री व अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया होत आहे.
बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसकडून तीन अर्ज तर विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांनी अपक्ष म्हणून शक्तिप्रदर्शन करत दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही काँग्रेसकडून एक व अपक्ष म्हणून एक असे दोन अर्ज दाखल केले. भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी पक्षातर्फे एक उमेदवारी अर्ज दाखल केला. बिद्री साखर कारखान्याचे संचालक राजेखान जमादार यांनी अपक्ष म्हणून एक, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महादेवराव महाडिक यांनी अपक्ष म्हणून एक, प्रतिमा सतेज पाटील यांनी अपक्ष म्हणून दोन, इचलकरंजीच्या ध्रुवती सदानंद दळवई यांनी अपक्ष म्हणून दोन, चंद्रकांत मारुती खामकर यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी पंधरा अर्ज दाखल केले. आतापर्यंत २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
आवाडे माघार घेतील
अर्ज भरण्यासाठी पी. एन. पाटील होते, प्रकाश आवाडे यांनी अर्ज दाखल केला असला तरी ते १२ डिसेंबरला ते माघार घेतील. त्यांनी मला ‘शब्द’ दिला असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
पी.एन. यांनी राजीनामा दिल्याची अफवा
कोल्हापूर : जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आज, बुधवारी सकाळीच तडकाफडकी राजीनामा दिल्याची अफवा दिवसभर शहरात होती. त्याबद्दल अनेकांनी ‘लोकमत’कडे फोन करून विचारणा केली. याबाबत एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘मी कशाबद्दल राजीनामा देऊ ..’अशी विचारणा केली. पाटील तब्बल सोळा वर्षे जिल्हाध्यक्ष आहेत.
बावड्यात आतषबाजी
कसबा बावडा : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विधानपरिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्याचा समजताच कसबा बावड्यात मुख्य रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर सतेज पाटील समर्थक कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी साखर, पेढे वाटत एकमेकांना आलिंगन देत आनंद साजरा केला. ताराबाई पार्कातील ‘अजिंक्यतारा’ कार्यालयातही फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
छाननी आज : दाखल अर्जावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार
प्राप्त अर्जांवर आज, गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी
डॉ. अमित सैनी यांच्यासमोर छाननी होणार आहे.
सतेज पाटील यांचे सूचक
महापौर अश्विनी रामाणे, नगरसेवक शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, अर्जुन आबिटकर, उमेश आपटे, योगीराज गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, विजयादेवी यादव.
ंमहादेवराव महाडिक यांचे सूचक
नगरसेवक सत्यजित कदम, नीलेश देसाई, ईश्वर परमार, विलास वास्कर, जिल्हा परिषद सदस्य शहाजीराव पाटील, शिवाजी इंदलकर, फुलाबाई कांबळे, माया चौगले, संतोष वंडकर, दगडू शेणवी.
‘महाडिक ’ दुसऱ्यांदा ‘शिंदें’च्या भेटीला
\गडहिंग्लज : विधान परिषद निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट गडहिंग्लज गाठले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सहकार्याची विनंती केली.
गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दल-जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे. स्वीकृत नगरसेवकांसह या आघाडीकडे दहा नगरसेवकांची मते आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास शिंदे यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली.
सहा महिन्यांपूर्वीच अॅड. शिंदे यांनी आमदार मुश्रीफ यांच्याकडून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केल्यामुळे मुश्रीफ व त्यांच्यातील ‘विळा-भोपळ्या’चे सख्य अधोरित झाले आहे. या पार्श्वभूमीवरच ते महिन्यापूर्वीच शिंदेंना भेटून गेले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा मंगळवारी त्यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली.
नगरपालिकेतील सत्तांतरानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिंदे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. तद्ववतच माजी आमदार सतेज पाटील यांच्याशीही शिंदेंचे घनिष्ठ संबंध आहेत. दोन वर्षांपूर्वी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या सहकार्याने मुश्रीफ यांनी गडहिंग्लज कारखान्याच्या अध्यक्षपदावरून शिंदेंना दूर केले. तेव्हापासून ‘शिंदे-मुश्रीफ’ यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या निवडणुकीत मुश्रीफ काँगे्रसबरोबर राहणार असल्यामुळेच ‘शिंदें’ची दहा मते निर्णायक ठरणार आहेत.
...आणि फोन खणखणले
कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेच्या जागेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल गेली चार दिवस उत्कंठा प्रचंड ताणलेली... कोण बाजी मारणार याबद्दल कार्यकर्त्यांतही प्रचंड घालमेल. बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांचा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस गणेश पाटील यांना फोन आला आणि त्यांनी सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्याचे जाहीर केले. त्यांनीच स्वत: सतेज व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनाही तशी माहिती दिली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि ‘समजले ते खरे आहे का?’ म्हणून मोबाईल खणखणू लागले. सोशल मीडियावर संदेशांचा महापूर सुरू झाला. खरे तर काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा सोमवारी (दि. ३० नोव्हेंबर) होण्याची शक्यता होती; परंतु उमेदवारीबाबतचा तिढा लवकर सुटला नाही; त्यामुळे ती पुढे ढकलली गेली. सुरुवातीला सतेज पाटील यांचे नाव पुढे होते; परंतु शेवटच्या दोन दिवसांत पी.एन. यांचेच नाव निश्चित झाल्याचे वातावरण होते.
महाडिक यांना उमेदवारी दिल्यास भाजप विरोध करणार नाही व ही जागा सहजपणे जिंकता येईल, असा विचार करून पुन्हा महाडिक यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच महाडिक यांच्यासाठी आग्रह धरला असल्याची चर्चा होती. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी वारंवार फोन करून नेत्यांना व प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही भंडावून सोडले होते. कधी नव्हे तेवढी उत्सुकता ताणली होती. मंगळवारी (दि. ८) प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बुधवारी घोषणा करणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्यांनी घोषणा न करता प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांच्याकडून थेट ‘एबी’ फॉर्म्स पाठवून दिले. ते मंगळवारी रात्रीच कऱ्हाडला येऊन थांबले होते. सकाळी लवकर ते कोल्हापुरात आले. त्यांनी सतेज पाटील यांना ही माहिती दिली व एक अध्याय संपला.