नऊ माजी, दोन विद्यमानांंची अनामत जप्त
By Admin | Updated: November 5, 2015 00:45 IST2015-11-05T00:42:43+5:302015-11-05T00:45:28+5:30
२८५ उमेदवारांवर नामुष्की : जवळपास पावणे दोन लाख रुपये जप्त

नऊ माजी, दोन विद्यमानांंची अनामत जप्त
कोल्हापूर : महापालिका निवडणूक यंदा पक्षीय पातळीवरच गाजली असली तरीही या निवडणुकीत ५०६ उमेदवारांपैकी २८५ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. विद्यमान नगरसेवक राजू पसारे यांच्यासह विद्यमान उपमहापौर जोत्स्ना पवार-मेढे यांचे पती बाळकृष्ण पवार-मेढे, सुनंदा तुकाराम तेरदाळकर यांनाही कमी मते मिळाल्याने त्यांची तसेच नऊ माजी नगरसेवकांचीही अनामत रक्कम जप्त झाली.
महापालिका निवडणूक कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप-ताराराणी आघाडी याशिवाय रासप, शेकाप, हिंदू महासभा, एस फोर ए, आदी छोट्या-मोठ्या पक्ष आघाड्यांनी लढविली. अनेकांनी विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढविली होती. तर एखाद्या उमेदवाराची मते विभागणी होऊन दुसऱ्याचा फायदा होण्यासाठीही काहीजण रिंगणात उतरले होते. एकूण वैध मतांच्या एक अष्टमांश मते उमेदवाराने मिळवावी लागतात, त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी ५००० रुपये, तर राखीव व महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०० अनामत रक्कम भरावी लागते. निवडणुकीत उमेदवारांकडून जप्त झालेली एकूण अनामत रक्कम पावणेदोन लाख रुपयांपर्यंत जाते.
या निवडणुकीत ताराराणी-भाजप महायुतीला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची छुपी युती झाल्याची चर्चा चांगलीच रंगली. त्यामुळेही अनेक पक्षांच्या उमेदवारांच्या अनामत रकमाही जप्त झाल्या. अनामत जप्त झालेल्या पक्षांच्या उमेदवारांमध्ये शिवसेना ४५, राष्ट्रवादी ३२, काँग्रेस २५, तर ताराराणी-भाजप महायुतीचे ५ उमेदवार व इतर लहान पक्ष व अपक्ष मिळून १७८ उमेदवार अशा एकूण २८५ उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. नगरसेविका सुनंदा तेरदाळकर यांनी मतदानापूर्वीच चार दिवसआधी माघार घेतल्याने त्यांना मते कमी मिळाली.
अनामत जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान नगरसेविकांच्या तिघा पतिराजांचा समावेश आहे. यामध्ये विद्यमान उपमहापौर जोत्स्ना मेढे-पवार यांचे पती बाळकृष्ण मेढे-पवार, विद्यमान नगरसेविका रेखा पाटील यांचे पती राजेंद्र पाटील, विद्यमान नगरसेविका रोहिणी काटे यांचे पती व माजी नगरसेवक प्रकाश काटे यांचा समावेश आहे. मधुकर काकडे, प्रदीप पोवार, चंद्रकांत साळोखे, धनाजी आमते, संभाजी बसुगडे, पांडुरंग आडसुळे, नंदकुमार गुर्जर, प्रकाश काटे, अशोक भंडारे या माजी नगरसेवकांनाही अनामत रक्कम वाचविण्यात अपयश आले. याशिवाय अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये ११६ उमेदवारांना ५० पेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर दहा उमेदवारांना दोन अंकी मतांचा आकडाही पार करता आलेला नाही. (प्रतिनिधी)