नऊ बंधारे पाण्याखाली
By Admin | Updated: July 4, 2016 00:29 IST2016-07-04T00:29:01+5:302016-07-04T00:29:01+5:30
जिल्ह्यात पावसाचा जोर : गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजऱ्यात अतिवृष्टी

नऊ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे. नऊ बंधारे पाण्याखाली गेले असून, चंदगड तालुक्यात घर व विहिरीची पडझड होऊन सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतही चांगला पाऊस सुरू असून गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ४६९.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता पंचगंगा नदीची पातळी २३ फुटांपर्यंत पोहोचली होती. राजाराम बंधाऱ्याशेजारी प्रतिसेकंद १५२३० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, रुई, सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर; तर भोगावती नदीवरील खडक-कोगे, राशिवडे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी १२०, दूधगंगा ९५, कासारी १५०, कडवी ९२, कुंभी १०७, पाटगाव ९४, घटप्रभा १२५, कोदे १३३ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासांत ०.३५ टी. एम. सी. म्हणजे १० टक्के वाढ झाली आहे. धरणात सध्या २७ टक्के जलसाठा असून तुळशी २६ टक्के, वारणा २७ टक्के, दूधगंगा १० टक्के, कासारी २४ टक्के, कडवी ४९ टक्के भरले आहे.
चंदगड तालुक्यात हजगोळी गावातील विठ्ठल शिंदे यांच्या घराची पडझड होऊन सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. कानडेगाव येथील लक्ष्मण देसाई यांच्या विहिरीचा संरक्षक कठडा कोसळून सुमारे ४९ हजारांचे नुकसान झाले.
शाहूवाडीत संततधार पाऊस
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात रविवारी दिवसभर पावसाच्या संततधार सरी कोसळत होत्या. वारणा, कडवी, कासारी, शाळी नद्या भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यात ४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शिरोळ बंधारा पाण्याखाली
शिरोळ : धरणक्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पंचगंगा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे़ रविवारी शिरोळ बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिरोळ-कुरुंदवाड जुना मार्ग बंद झाला आहे़
कुंभी प्रकल्प क्षेत्रात वाढ
साळवण : गगनबावडा तालुक्यातील कोदे, अणदूर व कुंभी मध्यम प्रकल्पच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी ५६ मि.मी. पाऊस झाला.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
करवीर- २०.३६,कागल- २५.०२, पन्हाळा- ३४.८५, शाहूवाडी- ६४.५०, हातकणंगले- १४.१२, शिरोळ- ८.४२,राधानगरी- ३७.१७, गगनबावडा- १०९, भुदरगड- २७.४०,गडहिंग्लज- १८.४२, आजरा- ४९.७५, चंदगड- ६०.६६.
काळम्मावाडी धरणक्षेत्रात पाऊस
सोळांकूर : काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात जून २०१६ अखेर ३८१ मिलिमीटर पाऊस झाला असून, रविवार दिवसअखेर ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात १.३२ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची आवश्यकता आहे. गतवर्षी जूनअखेर ७८४ मि.मी. पाऊस झाला होता. गतवर्षी १० टीएमसी पाणी शिल्लक होते. यावर्षी मृतसाठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला. दमदार पाऊस झाला तरच आॅगस्टअखेर धरण भरण्याची शक्यता आहे.
केर्ले धबधबा पाहण्यास गर्दी
मलकापूर : पर्यटकांना भुरळ घालणारा नयनरम्य केर्ले धबधबा कोसळू लागला आहे. मलकापूर-आंबा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे कडवी नदी भरून वाहू लागली आहे. हा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यांतील पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत.