निखिलने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल कराव
By Admin | Updated: March 10, 2015 00:16 IST2015-03-10T00:03:54+5:302015-03-10T00:16:16+5:30
महेंद्र शेलार : आयपीएलमध्ये निवड झालेल्या नाईकचा सत्कारे

निखिलने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल कराव
सावंतवाडी : निखिलचे कर्तृत्व असाधारण असेच आहे. त्याने अशीच प्रगती करीत राहावी आणि सावंतवाडीसह जिल्ह्याचे नाव उंचवावे, असे मत सावंतवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांनी व्यक्त केले. आयपीएल स्पर्धेत निवड झालेल्या निखिल नाईक याच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र रणजीपटू निखिल नाईक याची आयपीएलसाठी निवड झाली असून तो रविवारी पुण्याकडे रवाना झाला. यासाठी रविवारी सावंतवाडी येथे त्याचा खास सत्कार व शुभेच्छांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी क्रिकेटपटू दिलीप वाडकर, राजू भालेकर, अमेय तेंडुलकर, निशांत तोरस्कर, संदेश पावस्कर, लक्ष्मण परब, व्हिक्टर फेराव, निखिलचे वडील शंकर नाईक, बाळ मडगावकर, मिलिंद देसाई आदी उपस्थित होते.निखिलचा सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेलार यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, तू सावंतवाडीचे नाव आज उंचावले असून, यापुढेही असेच खेळात प्राविण्य मिळवत राहा. तुझा भविष्यकाळही यशस्वी असेल, असे सांगत शुभेच्छा दिल्या. माजी क्रिकेटपटू दिलीप वाडकर यांनी सांगितले की, निखिलने आयुष्यात भरपूर मेहनत घेतली आहे. अतिशय गरिबीतून तो मोठा झाला आहे. तो आज आयपीएलमध्ये खेळत आहे. हे सर्व त्याच्या कष्टाचे फळ असून आईवडिलांचे आशीर्वाद त्याच्या मागे आहेत. निखिलच्या वडिलांनी अपार मेहनत घेऊन त्याला घडवले. त्यामुळे तो आज यशस्वी झाला आहे. आता त्याने चांगला खेळ करावा आणि आयीपीएल प्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भरारी घ्यावी, असे आवाहन वाडकर यांनी यावेळी केले. निखिलला राजू भालेकर, बंड्या केरकर, दिलीप भालेकर, अमेय तेंडुलकर, निशांत तोरस्कर, अनिता सडवेलकर, राजू सावंत आदींनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)