कर्नाटकच्या मंत्र्याने घालविली स्मशानात रात्र
By Admin | Updated: December 9, 2014 01:18 IST2014-12-09T01:16:29+5:302014-12-09T01:18:14+5:30
अंधश्रद्धेला विरोध : भुतांचे अस्तित्व नाही

कर्नाटकच्या मंत्र्याने घालविली स्मशानात रात्र
बेळगावी : अंधश्रद्धा आणि भूतप्रेत या विरोधात जनजागृती करण्यासाठी कर्नाटकचे अबकारी शुल्कमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्मशानभूमीत एक रात्र घालविली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधून जारकिहोळी आणि समर्थकांनी शनिवारी बेळगावी येथील महानगरपालिकेच्या वैकुंठधाम या स्मशानभूमीवर रात्र घालविली. जारकिहोळी आणि शेकडो लोकांनी यावेळी स्मशानातच रात्रीचे जेवण घेतले. लोकांमधील अंधश्रद्धेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. अंधश्रद्धा ही अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. ती दूर केल्याशिवाय खालच्या जातीच्या व मागासवर्गाच्या लोकांना न्याय मिळवून देता येणार नाही. बिल गेट लक्ष्मीची पूजा करीत नाही. तरी ते जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मीदेखील लक्ष्मीला मानत नाही. तरीही माझा वार्षिक ६०० कोटी रुपयांची उलाढाल असलेला व्यवसाय आहे, असे जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. भूताचे अस्तित्व आहे आणि ते स्मशानभूमीसारख्या जागी वास करतात, या अंधश्रद्धेचे निर्मूलन आणि भूतप्रेताची भीती दूर करण्याच्या उद्देशानेच आपण स्मशानात रात्र घालविली, असे कर्नाटकात अंधश्रद्धाविरोधी विधेयक आणण्यासाठी लढा देणारे जारकिहोळी म्हणाले. (वृत्तसंस्था)