पुढील वर्षी राज्यासाठी वृक्ष लागवडीचे तीन कोटी उद्दिष्ट
By Admin | Updated: June 30, 2016 01:04 IST2016-06-30T01:03:55+5:302016-06-30T01:04:19+5:30
वनमंत्र्यांचा ‘व्हीसी’द्वारे आढावा : कोल्हापुरातील तयारीबाबत समाधान व्यक्त; ८ व ९ जुलैला पुण्यात आढावा बैठक

पुढील वर्षी राज्यासाठी वृक्ष लागवडीचे तीन कोटी उद्दिष्ट
कोल्हापूर : पुढील वर्षी राज्यासाठी तीन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शासकीय यंत्रणेला दिली. यावर्षी उद्या, शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णातील तयारीचा आढावाही त्यांनी संबंधित यंत्रणेकडून यावेळी घेतला. कोल्हापूर जिल्ह्णाने आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत राज्यासाठी यंदा दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यातील जिल्ह्णासाठी सहा लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी राज्यात एकाच वेळी हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर जिल्ह्णाच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तानाजी पाटील, वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, तहसीलदार तेजस्विनी पाटील, आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी वनमंत्र्यांना जिल्ह्णातील वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत तयारीबाबत माहिती दिली.
तानाजी पाटील म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी सहा लाखांचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करून आठ लाख आठ हजार वृक्षलागवडीसाठी खड्डे खणण्यात आले आहेत. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
एम. के. राव म्हणाले, वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, शुक्रवारचा मुख्य कार्यक्रम हा शिवाजी विद्यापीठ येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे; तर दुसरा कार्यक्रम कणेरी मठ येथे होणार असून, यावेळी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
रंगनाथ नाईकडे म्हणाले, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना ‘वृक्षमित्र’ बॅज दिले जाणार आहेत. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून राबविण्यात आलेल्या ‘वृक्षदान पुण्यसंचय’ योजनेला जिल्ह्णात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत ११ हजार रोपे जमा झाली आहेत.
वनमंत्री मुनगंटीवार यांनी हा उपक्रम पाच वर्षे कायम सुरू राहणार असून, या काळात ५५ कोटी वृक्षलागवडीचे राज्यासाठी उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यातील पुढील वर्षाकरिता राज्यासाठी तीन कोटी उद्दिष्ट असून, जिल्ह्णाचे उद्दिष्ट काही दिवसांत कळविले जाईल असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरणने शनिवार (दि. २)पासून नर्सरीतून रोपे तयार करण्याचे काम सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
८ व ९ जुलैला
पुण्यात बैठक
यावर्षी राबविण्यात आलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलैला राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची पुण्यात आढावा बैठक घेतली जाईल. यामध्ये हा कार्यक्रम राबविताना आलेल्या अडचणी, त्रुटी जाणून घेतल्या जातील. तसेच ज्यांनी काही नावीन्यपूर्ण योजना राबविल्या असतील, त्यांवर चर्चा करून त्याचा राज्यासाठी काही उपयोग करून घेता येईल का? याबाबत विचार केला जाईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.