पुढील वर्षी कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढविणार
By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:24:05+5:302014-12-09T00:26:12+5:30
राजेंद्र पाटील-यड्रावकर : जयसिंगपुरात शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाची सांगता

पुढील वर्षी कृषी प्रदर्शनाची व्याप्ती वाढविणार
जयसिंगपूर : शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे भविष्यात प्रत्येक वर्षी सर्वउपयुक्त प्रदर्शन भरविले जाईल. प्रदर्शनात चांगल्या जातीचे पशू, पक्षी, श्वान यांचा समावेश व्हावा, अशी सर्वांची मागणी आहे, त्याचा समावेश करून प्रदर्शनाची व्याप्ती वाढविणार, असे आश्वासन शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले.
येथील शरद संजीवनी कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, नगरसेवक युवराज शहा, सुनील पाटील, संभाजीराव मोरे, ‘शरद’चे संचालक अजित उपाध्ये, रावसाहेब भिलवडे, अमरसिंह पाटील, माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, जायंटस सहेलीच्या अध्यक्षा नीतू पाटील-यड्रावकर, शरद कारखान्याचे शेती अधिकारी सुधाकर पाटील, यड्राव बॅँकेचे दिलीप मगदूम, पिंटू खामकर, अर्जुन देशमुख उपस्थित होते.
कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने योगदान देऊन प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न केला. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल यड्रावकर यांनी कौतुक केले.
तालुका कृषी अधिकारी उमेश लंगरे म्हणाले, या प्रकारचे कृषी प्रदर्शन आपल्या भागात होत आहे. प्रदर्शनामधून नवनवीन शेती तंत्रज्ञान कसे वापरायचे व संशोधन याची माहिती मिळते. सर्व शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. मनुष्यबळाविना शेती करणे अवघड बनले आहे. अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, आपल्या भागात २५ हजार हेक्टर उसाची शेती आहे. संयोजकांनी चांगल्या पद्धतीने योगदान देऊन प्रदर्शन भरविण्याचा प्रयत्न केला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी शरद कारखान्याचे संचालक डी. बी. पिष्टे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बबन यादव यांनी आभार मानले.