वृृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:52+5:302021-07-05T04:15:52+5:30
कागल : बांधकाम कामगारांसाठीचा कायदा १९९६ मध्ये तयार झाला होता; पण मला कामगारमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. तेव्हा त्याची अंमलबजावणी ...

वृृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ सुरू करणार
कागल : बांधकाम कामगारांसाठीचा कायदा १९९६ मध्ये तयार झाला होता; पण मला कामगारमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. तेव्हा त्याची अंमलबजावणी आपण केली. हजारो कोटींचे कल्याणकारी मंडळ सुरू केले. आता पुन्हा ही जबाबदारी आल्यावर नवनवीन योजना राबवीत असून आता वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित विविध घटकांचा समावेश असेल, असे प्रतिपादन ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथे बांधकाम मजुरांना मोफत मध्यान्ह जेवण उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि. ३) मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सतीश माने, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, काॅ. शिवाजी मगदूम प्रमुख उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीमुळे पोटाला अन्न मिळत नाही म्हणून अनेक कामगार, मजूर गावी गेले. ते परत आले नाहीत. दुसऱ्या लाटेत त्यांच्या पोटापाण्याची सोय करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यातून मध्यान्ह भोजन योजनेचा उगम झाला. राज्यभरातील बांधकाम कामगारांना दोनवेळचे जेवण उपलब्ध करून देणार आहोत. प्रवीण काळबर यांनी स्वागत केले. भैया माने, कामगार विभागाचे संदेश आहिरे, कागल क्रिडाईचे अध्यक्ष सुशांत भालबर, प्रकाश गाडेकर यांची भाषणे झाली.
चौकट
● योग्य ठिकाणी पैसा गेला...
कागल क्रिडाईचे अध्यक्ष सुशांत भालबर म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगार महामंडळासाठी एक टक्का सेस आकारणी केल्यानंतर आमच्यासह राज्यभरातील बांधकाम व्यावसायिक चिंतेत होते; पण त्यांनी बांधकाम कामगारांना दिलेल्या एकूण योजना आणि आता दोनवेळचे जेवण पाहून आमचे पैसे योग्य ठिकाणी गेल्याचे समाधान वाटते.
फोटो
कागल येथे बांधकाम कामगारांना मोफत भोजन थाळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आली. या वेळी भैया माने, प्रवीण काळबर, प्रकाश गाडेकर, आदी उपस्थित होते.