अमावास्येचा उमेदवारांना धसका
By Admin | Updated: September 23, 2014 00:49 IST2014-09-23T00:29:06+5:302014-09-23T00:49:01+5:30
दुसऱ्या दिवशीसुद्धा एकही अर्ज नाही : शेवटच्या तीन दिवसांत उडणार झुंबड

अमावास्येचा उमेदवारांना धसका
कोल्हापूर : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा तर त्यासाठी दिवस आणि वेळ चांगलीच असावी, अशा मानसिकतेत अडकलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, निवडणूक प्रक्रिया सुरू होऊनही संपूर्ण जिल्ह्यात दहा मतदारसंघांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. गुरुवार, शुक्रवार व शनिवार अशा तीन दिवसांत मात्र अर्ज भरण्यास झुंबड उडणार, हे स्वाभाविक आहे.
उमेदवारी अर्जांची मात्र मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आज, सोमवारी करवीरमधून २१, तर कोल्हापूर दक्षिण मधून ९, कोल्हापूर उत्तरमधून ३५ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. राधानगरीसाठी ८, कागलमधून १८, इचलकरंजीतून ८, चंदगडसाठी २७, शिरोळसाठी २० अर्जांची विक्री झाली.
विधानसभेच्या निवडणुकीची शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर झाली. त्या दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली. परंतु, सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. या पंधरवड्यात शुभ काम करण्याचे टाळले जाते. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची मानसिकताही तशीच झाली आहे.
गुरुवारी (दि. २५) घटस्थापना आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून अर्ज भरण्यास खऱ्या अर्थाने इच्छुकांकडून सुरुवात होईल. शुक्रवार हा दिवस उमेदवारी अर्ज भरण्यास सर्वोत्तम असल्याने या दिवशी सर्वच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली; पण पहिल्या दिवशी दहाही मतदारसंघांत कोणीच अर्ज भरले नाहीत. आज दुसऱ्या दिवशीही तशीच स्थिती राहिली. आजही कोणीच अर्ज भरला नाही. मात्र, उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या लक्षणिय आहे. (प्रतिनिधी)