नवजात ‘नकुशी’ रस्त्यावर !
By Admin | Updated: December 9, 2014 01:17 IST2014-12-09T01:17:20+5:302014-12-09T01:17:54+5:30
मातेने नाकारले : शिरोली पुलाजवळील प्रकार; पोलिसांनी दिली मायेची ऊब

नवजात ‘नकुशी’ रस्त्यावर !
शिरोली : नवजात मुलीला उचलून घेतल्यावर मायेची ऊब लागली आणि ती रडायची थांबली. पुणे-बंगलोर महामार्गावर शिरोली पंचगंगा पुलाशेजारीच असणाऱ्या पीर बालेचॉँदसो दर्ग्याशेजारी मुलगी नको असलेल्या मातापित्यांनी अंदाजे २५ दिवसांच्या नवजात मुलीला कापडात गुंडाळून पालापाचोळ्यात टाकून दिले होते. ही घटना आज, सोमवारी
सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.
शिरोली परिसरातील अनेक नागरिक सकाळी फिरण्यासाठी महामार्गाच्या पूर्वेकडील सेवा मार्गावर असतात. सोमवारीही स्क्रॅप व्यावसायिक शमुवेल गोडबोले, शशिकांत नलवडे, सुजित समुद्रे, प्रकाश कांबळे हे सकाळी सहा वाजता फिरण्यासाठी गेले होते. पंचगंगा पुलाजवळील दर्ग्याजवळ शमुवेल गोडबोले यांना या बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. गोडबोले व इतरांनी जवळ जाऊन पाहिले असता नवजात मुलगी कापडात गुंडाळून पाल्यात टाकली होती. सकाळी नदी किनाऱ्यावर धुके आणि कडाक्याच्या थंडीत हे नवजात बालक कुडकुडत होते. गोडबोले यांनी तत्काळ शिरोली पोलीस ठाण्यात संपर्क साधला.
महिला कॉन्स्टेबल नंदा शिंदे यांनी रडणाऱ्या नवजात मुलीला उचलून घेतले आणि मायेची उब लागताच मुलगी शांत झाली. या मुलीला शेजारी दुधाने भरलेली बाटली ठेवली होती. या मुलीला घेऊन पोलीस नाईक दिलीप कुंभार, प्रमोद पाटील, बाबा चौगले हे शिरोली पोलीस ठाण्यात आले.
महिला कॉन्स्टेबल नंदा शिंदेंनी नवजात मुलीच्या अंगावरील थंडीने ओले झालेले कपडे काढले. शेजारील व संतोष हॉटेल मालकाच्या पत्नीकडून दुसरे कपडे घेऊन या मुलीला अंगावर टाकून गुंडाळले. तिला बाटलीने दूध पाजले. रात्रभर रडत असलेली ही मुलगी दुधामुळे शांत झोपली.
शिरोली पोलिसांनी या नवजात मुलीला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सीपीआरमधील डॉक्टरांनीही तिला ताबडतोब उपचार सुरू केले. हे नवजात गोंडस बालक पाहून अनेकांचे मन हेलावले. (प्रतिनिधी)