हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव
By Admin | Updated: May 5, 2015 01:09 IST2015-05-05T01:09:48+5:302015-05-05T01:09:48+5:30
सर्वेक्षण सुरू : नगररचना लागले कामाला; आठवड्यात आयुक्तांना अहवाल

हद्दवाढीसाठी नव्याने प्रस्ताव
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाने फेटाळल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागात आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने नवा प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. महापालिका हद्दीपासून एक ते दोन किलोमीटर परिघात किती गावे समाविष्ट करून घेता येऊ शकतील, याची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे. आठवड्यात नव्या हद्दवाढीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर करणार असल्याची माहिती सहायक संचालक नगररचना डी. एस. खोत यांनी ‘लोकमत’ला सांगितली.
राज्य शासनाने एप्रिल महिन्यात ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. शासनाने हद्दवाढीस नकार दर्शविला असला तरी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सोडलेले नाहीत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १९ गावातील नागरिकांची मनधरणी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शहराच्या हद्दीच्या पाच किलोमीटर परिघात ७८ गावे तर १० किलोमीटर परिघात ९३ गावे येतात. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने गावे शहरात समाविष्ठ करण्यापेक्षा लगतच्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरील गावांना शहरात समाविष्ठ करण्याच्या विचार पुढे आला. त्यानुसार नगररचना विभागाने अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले.
शहराच्या हद्दीच्या एक किलोमिटर हद्दीत वडणगे, शिये, कळंबा, उचगाव, पाचगाव, आदी लहान-मोठी दहा गावे येतात तर दोन किलोमीटरच्या अंतरावर आंबेवाडी, निगवे, शिरोली एमआयडीसीसह १५ गावे येतात.
या गावांचे विद्यमान जमीन वापर पृथ:करण, त्यावर अवलंबून असणारी लोक संख्या, शेती व्यवसायावर आधारित लोक संख्या, शहरातील साधन संपत्तीचा वापर करणारे लोक यांचे पृथ:करण व त्यानंतर सर्वेक्षण करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. आठवड्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती डी. एस. खोत यांनी दिली. (प्रतिनिधी)