नव्या गीतांनी तरुणाई घायाळ
By Admin | Updated: January 19, 2015 00:28 IST2015-01-19T00:13:56+5:302015-01-19T00:28:37+5:30
भीमा फेस्टिव्हल : ‘मितवा’च्या कलाकारांनी केले रसिकांना मंत्रमुग्ध, गर्दीचा उच्चांक

नव्या गीतांनी तरुणाई घायाळ
कोल्हापूर : नव्या-जुन्या गीतांची पेशकश, स्पेशल इफेक्टसह उत्कृष्ट निवेदन आणि मिमिक्री असा सुंदर मिलाप आज, रविवारी भीमा फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी रसिकांना अनुभवण्यास मिळाला. आज ‘मितवा’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी चित्रपटातील प्रोमो सादर करून जणू रसिकांच्या हृदयाला हात घातला. निमित्त होतं येथील ‘चॅनेल बी’च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित भीमा फेस्टिव्हलचे. मराठीतील आघाडीचा कलाकार स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रथमेश परब आणि पुष्कर श्रोत्री यांच्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली
शिवाजी स्टेडियम येथे १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘मितवा’ या चित्रपटातील स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी यांनी प्रोमो गीत सादर केले. सागर कारंडे, पुष्कर श्रोत्री यांनी बहारदार अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. सागर कारंडे याने तर शाहरुख खान, मकरंद अनासपुरे यांची मिमिक्री करत उपस्थितांना हसवले.
मानसी नाईक हिने सादर केलेल्या ‘टिक-टिक वाजते डोक्यात...’ या गाण्याने फेस्टिव्हलला चार चाँद लावले तर ‘आता माझी सटकली... ’ या गाण्यावर प्रथमेश परब याने उत्तम सादरीकरण करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ‘टाईमपास’ या चित्रपटातील ‘ही पोरी साजूक तुपातली....’ हे गाणे मानसी नाईक हिने सादर केले. आदर्श शिंदे याने ‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी’ हे गीत सादर करून जणू स्टेडियमचे वातावरण भावमय केले. रेश्मा सोनावणे हिने तर ‘चांदणं चांदणं झाली रात, एका पुनवेची पहाट झाली पहाट...’ हे गीत सादर केले. पूजा सावंतने ‘एकवीरा आई डोंगरावरी...’ या कोळीनृत्यावर संपूर्ण तरुणाईला जणू डोलवले. मधुरा कुंभार हिने विनोदी ढंगात निवेदन केले.
एक ग्रॅम सोने द्या
शिर्डीच्या साईबाबांसाठी सोन्याचे सिंहासन आहे, तर तिरुपती-बालाजीसाठी मंदिराचा कळसच सोन्याचा आहे. महालक्ष्मी मंदिरास ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी येत्या नवरात्रात ३५ ते ४० किलोेंची सोन्याची पालखी अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता अनेक उद्योजक, दानशूर व्यक्तींनी हे सोने दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे; पण मला कोल्हापुरातील प्रत्येक नागरिकांकडून केवळ एक ग्रॅम सोने हवे आहे. त्यातूनच मी महालक्ष्मीची पालखी करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या पालखीचे कामास पुढील महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे. तरी एक ग्रॅम सोने आपल्या इच्छेनुसार देण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.