स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड पाठवून फसवणुकीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:25+5:302020-12-31T04:25:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्पीड पोस्टाद्वारे ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे असलेले क्रेडिट कार्ड व ...

New fraudulent fraud by sending credit cards through Speed Post | स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड पाठवून फसवणुकीचा नवा फंडा

स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड पाठवून फसवणुकीचा नवा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : स्पीड पोस्टाद्वारे ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे असलेले क्रेडिट कार्ड व अर्ज पाठवून फसवणूक करण्याचा नवा फंडा सुरु झाला आहे. याचा अनुभव कोल्हापूरमधील स्टेशन रोडवरील पाटणकर पार्कमधील अजय जाधव यांना आला असून, त्यांनी बुधवारी ‘लोकमत’ला याविषयीची माहिती दिली. तसेच शाहुपूरी पोलिसातही त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

घडले ते असे : ई-काॅमर्सद्वारे ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या देशातील बड्या कंपन्यांच्या नावाचा वापर करुन ही फसवणूक केली जात आहे. या कंपन्यांच्या नावे प्रथम तुम्हाला फोन करुन तुम्ही अमुक इतके लाख रुपये जिंकल्याचे सांगितले जाते. जाधव यांना ९ लाख रुपये जिंकल्याचा मेसेज आला होता. त्यावर विश्वास बसावा म्हणून स्पीड पोस्टाद्वारे त्या कंपनीचे क्रेडिट कार्ड आणि सोबत एक अर्ज चक्क त्यांच्या पत्त्यावरच पाठविण्यात आला. या अर्जात पॅनकार्ड, आधार क्रमांक, सही, बँक खात्याची इत्थंभूत माहिती भरून घेतली जाते. हा भरलेला अर्ज त्या कंपनीच्या पत्त्यावर पाठवावा, असे सूचविले जाते. हा अर्ज बघितल्यानंतर कोणाचाही यावर विश्वास बसतो, असाच तो तयार करण्यात आला आहे. क्रेडिट कार्डही बँकेसारखेच आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी अर्ज व क्रेडिट कार्ड पाहून ज्येष्ठ नागरिक या नव्या फंड्याला फसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड व अर्ज अशिष जाधव यांना गुजरातवरून आला होता. परंतु, त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरोधात तक्रार दिली. नागरिकांनी अशा अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फसवणूक प्रकारात बदल..

नागरीकांकडून बँक खात्याची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील पैसे हडप करण्यासाठी रोज नवे फंडे वापरले जात आहेत. त्यातून अनेकांच्या आयुष्याची पुंजी हे गुन्हेगार एका क्षणात लुटू लागले आहेत. यापूर्वी बँक खात्याची माहिती अमुक एका बँकेतून बोलतो असे सांगून फोन येत असे आता हीच माहिती लिखित स्वरुपात मागवली जात आहे.

Web Title: New fraudulent fraud by sending credit cards through Speed Post