नवीन ‘अभियांत्रिकी’ला परवानगी नको
By Admin | Updated: December 2, 2014 00:48 IST2014-12-02T00:43:31+5:302014-12-02T00:48:46+5:30
धनंजय महाडिक यांची केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांकडे मागणी

नवीन ‘अभियांत्रिकी’ला परवानगी नको
कोल्हापूर : महाराष्ट्रात गेले दहा वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली असून त्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यासाठी आगामी काळात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी देऊ नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.
राज्यात १९९५ ला ९४ अभियांत्रिकी महाविद्यालये होती, त्यामध्ये २२ हजार ७४० प्रवेश क्षमता होती. पण गेल्या पंधरा वर्षांत ३०९ महाविद्यालये कार्यरत झाली आहेत. या महाविद्यालयांत १ लाख १४ हजार २६८ प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयांतून प्रत्येक वर्षी पाच हजार जागा रिक्त राहतात. ए.आय.सी.टी.ई.च्या नियमांचे पालन करून १२ ते १५ कोटी रुपये खर्च करून अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहिल्या पण विद्यार्थ्यांअभावी अनेक संस्था, महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत शिवाय प्राध्यापकांचे पगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
एकूणच या क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय-धोरणांनुसार तांत्रिक कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांची या देशाला मोठी गरज आहे पण शिक्षणाचा दर्जा व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अस्तित्व टिकविण्यासाठी केंद्र सरकारच्या एच.आर.डी. विभागाने नवे धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांना काही सवलती द्याव्यात, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली.