नवनिर्मिती, कलापरंपरेचा गौरव

By Admin | Updated: October 15, 2014 00:29 IST2014-10-15T00:21:18+5:302014-10-15T00:29:35+5:30

राष्ट्रीय जाहिरात दिन : अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर यांच्यासह रौप्यमहोत्सवी अ‍ॅड एजन्सीजचा सत्कार

New creation, the pride of art | नवनिर्मिती, कलापरंपरेचा गौरव

नवनिर्मिती, कलापरंपरेचा गौरव

कोल्हापूर : ‘पासष्टावी कला’ म्हणून मान मिळालेल्या जाहिरात कलेचा, नवनिर्मितीचा, शब्दलालित्याचा आणि कला-कौशल्याचा गौरव आज, मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी ज्यांच्या लोगोची निवड झाली, त्या ‘निर्मिती ग्राफिक्स’चे अनंत खासबारदार आणि शिरीष खांडेकर, कोल्हापुरातील पहिल्या अ‍ॅड एजन्सीजचे संचालक दीपक धोपेश्वरकर व रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या अ‍ॅड एजन्सींचा यावेळी सत्कार करण्यात आला. निमित्त होते राष्ट्रीय जाहिरात दिनाचे.
शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये आसमा, फेम, क्रिडाई आणि ‘कोल्हापूर कॉलिंग’ या संस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. व्यासपीठावर ‘आसमा’चे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, ‘फेम’चे अध्यक्ष अमर पाटील, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष गिरीष रायबागे, ‘कोल्हापूर कॉलिंग’चे अध्यक्ष पारस ओसवाल, कौस्तुभ नाबर, ‘आसमा’चे उपाध्यक्ष विवेक मंद्रुपकर उपस्थित होते. प्रवेशद्वारावर ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या लोगोची प्रतिकृती लावली होती.
यावेळी संजय घोडावत म्हणाले, केंद्र सरकारने निर्मिती ग्राफिक्सच्या लोगोची ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी केलेली निवड ही कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगातील प्रमुख दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही, याची खंत पंतप्रधान मोदी यांना आहे. भविष्यात भारतातील ३० विद्यापीठांचा त्यात समावेश व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामध्ये संजय घोडावत युनिव्हर्सिटीचा समावेश असेल, अशी मी ग्वाही देतो. ‘स्वच्छ कोल्हापूर अभियाना’साठी मी सदैव तत्पर असेन. यावेळी घोडावत यांनी कोल्हापुरातील रस्त्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
सत्कारानंतर अनंत खासबारदार यांनी कोल्हापूरबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, कोल्हापूरच्या कलापरंपरेचे पाईक म्हणून मी आणि शिरीष खांडेकर यांनी दहा वर्षांपूर्वी ‘निर्मिती’ची स्थापना केली. केंद्र सरकारच्या वेबसाईटवर वेगवेगळ््या २७ अभियानांसाठी ‘लोगो’च्या स्पर्धा जाहीर करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०२० पर्यंत महात्मा गांधींच्या स्वप्नातला ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावयाची आहे. हा उद्देश डोळ््यांसमोर ठेवून हा लोगो केला.
त्यानंतर दीपक धोपेश्वरकर, ‘आसमा’चे संस्थापक अध्यक्ष अरुण दीक्षित, पारस ओसवाल, ‘क्रिडाई’चे गिरीष रायबागे यांनी मनोगत व्यक्त केले. अमर पाटील म्हणाले, कोल्हापुरातील जाहिरात संस्थांची शिखरसंस्था असलेल्या ‘आसमा’ची नवनवीन संकल्पना आणि सामाजिक कार्यासाठी ख्याती आहे. फेम संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारीही कोल्हापूरला मिळाली हा सन्मानच आहे. जाहिरात कलेचा दिवस असावा या विचारांतून ‘राष्ट्रीय जाहिरात दिना’ची संकल्पना आकाराला आली.
यावेळी रौप्यमहोत्सव पूर्ण केलेल्या क्लायमॅक्स अ‍ॅडव्हर्टायझर्सचे उदय जोशी, अलंकार पब्लिसिटीचे राजाराम शिंदे, बिमल पब्लिसिटीचे जगदीशभाई साखरिया, जयेंद्र पब्लिसिटीचे दीपक धोपेश्वरकर, किसान पब्लिसिटीचे दत्तात्रय कुलकर्णी, ललित अ‍ॅडव्हर्टायझर्सचे अजित नरेवाडीकर, लुकतुके पब्लिसिटीचे सुहास लुकतुके, महाजन पब्लिसिटीचे प्रफुल्ल महाजन, मयूर अ‍ॅडव्हर्टायझर्सचे अरुण दीक्षित, मल्टीप्रिंट अ‍ॅडव्हर्टायझर्सचे कौस्तुभ नाबर, पँथर पब्लिसिटीचे शरद पाटील, संपर्क अ‍ॅड एजन्सीचे मोहन कुलकर्णी, सुधीर शिरोडकर, संजीव चिपळूणकर, युनिव्हर्सल सर्व्हिसचे आनंद कुलकर्णी, इंटरट्रेड अ‍ॅडव्हर्टायझर्सचे सलीम देवळे, ललित अ‍ॅडव्हर्टायझर्सचे अजित नरेवाडीकर यांचा सत्कार करण्यात आला. मोहन कुलकर्णी यांनी स्वागत केले. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले. विवेक मंद्रूपकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

हा सत्कार ममत्व, प्रेम, आपुलकीचा...
सत्कारानंतर अनंत खासबारदार यांनी सद्गत भावनेने सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी आमच्या लोगोची निवड झाल्याचे समजल्यानंतर दहा वर्षांचा प्रवास डोळ्यांसमोर आला. पंतप्रधानांच्या हस्ते मी एकट्याने सत्कार स्वीकारला असला तरी हे यश शिरीष खांडेकर, आमचे गुरू, कुटुंबीय, मित्र, ज्ञान देणाऱ्या पुस्तकांचा आहे, ममत्व, प्रेम आणि आपुलकीचा आहे. या लोगोचे चळवळीत रूपांतर करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रेमाच्या ऋणात आम्ही राहू.

कोल्हापुरात आसमा, फेम, क्रिडाई आणि कोल्हापूर कॉलिंगच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते निर्मिती ग्राफिक्सचे अनंत खासबारदार व शिरीष खांडेकर यांचा कुटुंबीयांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी कौस्तुभ नाबर, ‘आसमा’चे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, ‘फेम’चे अध्यक्ष अमर पाटील, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष गिरीष रायबागे, कोल्हापूर कॉलिंगचे अध्यक्ष पारस ओसवाल, विवेक मंद्रूपकर उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात कोल्हापुरातील पहिली अ‍ॅड एजन्सी असलेल्या जयेंद्र पब्लिसिटीचे दीपक धोपेश्वरकर यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: New creation, the pride of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.