नेजमध्ये जनसेवा ग्रामविकास आघाडीने घडविले सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:54+5:302021-01-21T04:23:54+5:30
कुंभोज : प्रचंड इर्षा, चुरस तसेच अटीतटीच्या झालेल्या नेज ...

नेजमध्ये जनसेवा ग्रामविकास आघाडीने घडविले सत्तांतर
कुंभोज : प्रचंड इर्षा, चुरस तसेच अटीतटीच्या झालेल्या नेज (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा ग्रामविकास आघाडीने अकरापैकी सात जागा जिंकून सत्तांतर घडविले. विरोधी लोकराज्य आघाडीने तीन, तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली.
काॅंग्रेस, भाजपप्रणित बी. एस. गारे, बी. जे. पाटील, सुनील देशमुख, रवींद्र खोत, बाळासाहेब चव्हाण, बाबासाहेब नकाते यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा ग्रामविकास आघाडी तसेच शिवसेना पुरस्कृत बी. एल शिंगे यांच्या नेतृत्वाखालील लोकराज्य आघाडीदरम्यान अकरा जागांसाठी सरळ लढत झाली.
लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग एकमध्ये आघाडीप्रमुख रवींद्र खोत यांचे पुतणे शुभम खोत, तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंगे यांचे चिरंजीव आकाश शिंगे विजयी झाले. ज्योती अरविंद नेर्ले या एकमेव अपक्ष विजयी झाल्या .
प्रभाग दोनमधून जनसेवा आघाडीचे मनोज कांबळे, तर लोकराज्य आघाडीच्या सजाबाई कांबळे, हनिफा मुल्ला विजयी झाल्या. जनसेवा ग्रामविकास आघाडीचे प्रभाग तीनमधून अमोल चव्हाण, ज्योती नेजकर विजयी झाले.
प्रभाग चारमधील शिवपुरीच्या लक्षवेधी लढतीत जनसेवा ग्रामविकास आघाडीने तिन्ही जागा जिंकत प्रभाग तीन व चारमध्ये वर्चस्व मिळविले. येथून रमेश घाटगे, दीपाली गोंधळी, विद्या चव्हाण विजयी झाल्या. जनसेवा आघाडीच्या दोन महिला उमेदवारांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले.
एका मताची किमया आणि किंमत पुन्हा चर्चेत.....!!
२००५ मध्ये एका मताने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविल्याने त्या एका मताची किमया ग्रामस्थांच्या आजही स्मरणात आहे. या निवडणुकीत जनसेवा आघाडीच्या नंदिनी काटकर यांचा केवळ एका मताने पराभव झाल्याने एका मताच्या किमयेनंतर एका मताची किंमत नेत्यांसह, उमेदवार तसेच मतदारांना पुन्हा कळली. यानिमित्ताने एक मत मात्र पुन्हा चर्चेत आले.