अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

By Admin | Updated: April 9, 2016 00:41 IST2016-04-09T00:38:44+5:302016-04-09T00:41:44+5:30

वारणा पाणी प्रश्न : वारणा बचाव कृती समितीची स्थापना; उद्या दानोळी ‘बंद’ करणार

Negative opposition to the nectar scheme | अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

अमृत योजनेला दानोळीचा ठाम विरोध

दानोळी : येथील वारणा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देणार नाही, अशी ठाम भूमिका वारणा बचाव कृती समितीने दानोळी येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत या अमृत योजनेला हद्दपार करू, असा इशारा देऊन इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. उद्या, रविवारी ‘दानोळी बंद’चाही इशारा देण्यात आला आहे़
यावेळी माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, इचलकरंजी शहराची ही अमृत योजना नसून, भविष्यात दानोळीच्या शेतकऱ्यांना विष घेऊन आत्महत्या करणारी आहे़ आमदार हाळवणकर यांनी जनतेची दिशाभूल करून अमृत योजना घाईगडबडीत मंजूर केल्यामुळे यात नक्कीच काळाबाजार आहे़ इचलकरंजीची नदी ही पंचगंगा असून वारणा ही दानोळी परिसरातील लाखो नागरिकांची आहे़ या पाण्यावर इचलकरंजीकरांनी हक्क सांगू नये, अन्यथा वारणेचा हिसका दाखवू़
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे म्हणाले, इचलकरंजी शहराने पंचगंगा नदीला दूषित केले आहे़ त्यामुळे या अमृत योजनेला आलेला ७१ कोटी रुपयांचा निधी पंचगंगा नदीचे पाणी शुद्धिकरण प्रकल्पासाठी वापरून इचलकरंजीकरांनी पंचगंगेचेच पाणी प्यावे, असा इशारा दिला़
यावेळी पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव शिंदे म्हणाले, दानोळी ग्रामपंचायतीने फक्त शिष्टाचाराचे काम केले असून, याबाबतचा ग्रामपंचायतीने कोणताही ठराव दिलेला नाही़ आतापर्यंत कोणी मागितली नाही़, अशा परिस्थितीत ही योजना मंजूर कशी झाली, असा सवाल केला़ माजी सरपंच गुंडू दळवी म्हणाले, इचलकरंजीला पाणी देऊन दानोळी परिसरातील लोकांनी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी कोठून घेणार? ही योजना जरी मंजूर झाली असली तरी वारणाकाठचे लोक या मंजुरीचा डाव हाणून पाडतील़
यावेळी माजी सरपंच बापूसो दळवी म्हणाले, दानोळीचा मराठवाडा व विदर्भ व्हायला नको़ तसेच गावातील कोणत्याही व्यक्तींने मतभेद न ठेवता एकत्र येऊन या इचलकरंजी अमृत योजनेला हाकलून लावण्यासाठी सज्ज राहावे. यावेळी मानाजीराव भोसले, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, रावसाहेब भिलवडे, केशव राऊत, विश्राम चव्हाण, सुनील शिंदे, अनिल खेत्राप्पा, आण्णासो पोलिस, पद्माकर कांबळे, सुरेश माणगावे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़


सभेत झालेले ठराव
इचलकरंजी शहराला पाणी देण्यास विरोध, दानोळी गावात पंपहाऊस उपसा संचासाठी कोणताही शेतकरी जमीन देणार नाही, सर्व शासकीय अधिकारी, लोप्रतिनिधी यांना या योजनेसंदर्भात जबरदस्ती प्रवेश करू दिला जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे खोची ते कनवाडपर्यंतच्या गावांनी नामंजुरीचा ग्रामपंचायतीचा ठराव देणे, कोणाचाही राजकीय दबाव आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,याची दखल न घेतल्यास याचिका दाखल करणाऱ, इचलकरंजी नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था शोधावी, असे ठराव सभेत मंजूर करण्यात आले़


जयसिंगपूर-सांगलीचा प्रस्ताव नाकारला
जयसिंगपूर व सांगली शहराने यापूर्वी दानोळी येथून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव दिला होता़ मात्र, दानोळीकरांनी हा प्रस्ताव धुडकावला असताना इचलकरंजी नगरपालिकेने अमृत योजनेस मंजुरी आणून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवठेसार, कुंभोज, खोची, नरंदे, दुधगाव, कवठेपिराण, समडोळी, आदी गावांसह अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे दानोळी गावाने एल्गार उगारला आहे़

Web Title: Negative opposition to the nectar scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.