हलकर्णीत वाहतूक नियंत्रण कक्षाची गरज

By Admin | Updated: November 30, 2014 23:59 IST2014-11-30T23:26:49+5:302014-11-30T23:59:06+5:30

राज्य परिवहन महामंडळ : गडहिंग्लज तालुक्यातील प्रवासी वर्गाची गैरसोय दूर होणे गरजेचे

The need for transport control room at Halakarni | हलकर्णीत वाहतूक नियंत्रण कक्षाची गरज

हलकर्णीत वाहतूक नियंत्रण कक्षाची गरज

प्रकाश इंगळे - हलकर्णी -गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वभागातील महत्त्वाची बाजारपेठ व मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या हलकर्णी येथे राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू करावा, अशी प्रवाशांनी व जनतेची मागणी आहे.
हलकर्णी, तेरणी व हिडदुगी येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला आहेत. याठिकाणी आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तांत्रिक व पदवी शिक्षणासाठी या भागातील विद्यार्थी भडगाव, महागांव व गडहिंग्लजला जातात. मात्र, सवलतीचा एस.टी. पास काढण्यासाठी त्यांना गडहिंग्लज आगाराकडे जावे लागते.
गडहिंग्लज आगारातून पास घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालय बुडवावी लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते.
गडहिंग्लज, संकेश्वर, कोल्हापूर आणि बेळगावला जाण्यासाठी या भागातील प्रवाशांना हलकर्णी येथेच यावे लागते. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या परिसरातील एस. टी. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी आणि प्रासंगिक करारावरील गाड्यांसह एस.टी.च्या सोयी-सवलतींचा लाभ प्रवाशांना वेळेत मिळण्यासाठी येथे वाहतूक नियंत्रण कक्षाची आवश्यकता आहे.


पदाधिकाऱ्यांनीही वेधले होते लक्ष
महसूल खात्याच्या राजस्व अभियानातंर्गत विस्तारित समाधान योजनेच्या येणेचवंडी येथे आठवड्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात हलकर्णी भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच व ग्रामस्थांनीदेखील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या मागणीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.


बाजारगाड्या सुरू कराव्यात
हलकर्णी येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो. खणदाळ, बसर्गे, येणेचवंडी, नौकुड, नरेवाडी, मनवाड, नंदनवाड, कुंबळहाळ, इदरगुच्ची, कडलगे, अरळगुंडी, तेरणी व बुगडीकट्टी या गावांतील नागरिक बाजारासाठी हलकर्णीला येतात. त्यांच्यासाठी बाजारगाड्या सुरू केल्यास प्रवाशांची सोय होऊन आगाराला उत्पन्नही मिळेल.

Web Title: The need for transport control room at Halakarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.