बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्षाची गरज
By Admin | Updated: March 12, 2015 00:10 IST2015-03-11T22:17:21+5:302015-03-12T00:10:18+5:30
भरमा कांबळे : उत्तूरला तालुकास्तरीय अधिवेशन उत्साहात

बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी संघर्षाची गरज
उत्तूर : बांधकाम कामगारांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. प्रश्न सुटण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर संघर्ष करण्याची गरज आहे. संघर्ष केला तरच न्याय मिळतो. त्यामुळे बांधकाम कामगारांनी एकजूट उभी करून आपली ताकद गावा-गावांतून उभी करावी, असे प्रतिपादन बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी आजरा तालुकास्तरीय लालबावटा बांधकाम कामगार संघटना आयोजित पहिल्या अधिवेशनात बोलताना केले.कॉ. गोविंद पानसरेंच्या प्रतिमेचे पूजन करून कै. कॉ. मलाबादे, के. एल. बजाज, माजी खासदार सदाशिव मंडलिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कॉ. कांबळे म्हणाले, आजरा तालुक्यात कामगार मंडळात महिलांची संख्या उल्लेखनीय आहे. वाढत्या महागाईमुळे कष्टकरी वर्गाचे जगणे मुश्कील बनले आहे. संघर्ष केला तरच पदरात पडते, अन्यथा काहीच मिळत नाही. तालुका, गावपातळीवरील संघर्षासाठी कामगारांनी काम करावे तरच प्रश्न सुटतील. महिला कामगार महिलेला प्रसुती रजा मिळावी, कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठी ५० हजारांचा निधी मिळावा अशी मागणी केली. काँंगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, शिवसेना यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. यासाठी लाल-बावटा हा पर्याय उभा करा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. भाऊसाहेब कसबे, जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचलन केले. नवनाथ चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पानसरेंवर गोळ्या कुणी झाडल्या : नारकर
कष्टकरी जनतेचे सेवक असणारे
कॉ. गोविंद पानसरेंवर गोळ्या झाडणारे कोण आहेत? त्यांचा तपास अजून का लागत नाही. लढाई करणारी मंडळी सरकार चालवणाऱ्यांना नको आहेत. तातडीने पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घ्या, अशी मागणी अधिवेशनात मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. डॉ. उदय नारकर यांनी केली. न्यायासाठी संघटित व्हा, असे आवाहन केले.
अधिवेशनातील
प्रमुख मागण्या
कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्याला अटक करा, दीपावली भेट ५ हजार रूपये द्या, ज्येष्ठ कामगारांना ३ हजार पेन्शन द्या, घरासाठीचे अनुदान ताबडतोब द्या, लॅपटॉप/टॅबलेट शिष्यवृत्ती निधी द्या, जिल्हा स्तरावर कामगार मंडळ स्थापन करावे, कोल्हापूर, इचलकरंजी बरोबरच आजरा, चंदगड, भुदरगडसाठी गडहिंग्लज येथे स्वतंत्र कार्यालय करा यासाठी मोर्चाचे आयोजन प्रांताधिकारी कार्यालयावर करण्याचे ठरले.