कोविड काळात तणाव व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:02+5:302021-07-14T04:27:02+5:30
कोल्हापूर : काही दिवसांपासून संपूर्ण जग कोविड महामारीने त्रस्त असून, यामुळे अनेक समस्या मानवी जीवनात उभ्या राहिल्या असून, विद्यापीठ ...

कोविड काळात तणाव व्यवस्थापन काळाची गरज
कोल्हापूर : काही दिवसांपासून संपूर्ण जग कोविड महामारीने त्रस्त असून, यामुळे अनेक समस्या मानवी जीवनात उभ्या राहिल्या असून, विद्यापीठ प्रशासनालासुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातून कर्मचाऱ्यांसमोर समस्या निर्माण होत असून त्यांना विविध प्रकारच्या ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्यावर होत असून, यासाठी या ताण-तणावाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे मत शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांसाठी ‘कोविड काळातील व्यवस्थापन’ या विषयावरील पाच दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ. हिर्डेकर यांनी गुंफले. या वेळी प्रा. डॉ. ए. एम. गुरव, बाबा सावंत उपस्थित होते. ताण-तणाव योग्य व्यवस्थापनाने कमी करता येतो. व्यक्तीला येणारा तणाव हा इतर कारणामुळे कमी, परंतु त्या व्यक्तीच्या नकारात्मक दृष्टिकोनातून जास्त तणाव निर्माण होत असतो. यासाठी परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय प्रत्येकाने करून घेणे गरजेचे असल्याचे डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले. अतुल एतवाडकर यांनी आभार मानले.