भगवान महावीरांच्या तत्त्वांची गरज
By Admin | Updated: December 22, 2014 00:15 IST2014-12-22T00:12:36+5:302014-12-22T00:15:00+5:30
उज्ज्वल निकम : दक्षिण भारत जैन सभेच्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण

भगवान महावीरांच्या तत्त्वांची गरज
कोल्हापूर : इस्लामाबाद येथील भेटीत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मी निक्षून सांगितले होते की, दहशतवादाला आवरा, स्वत:ला सावरा; पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि हेच दुर्लक्ष पेशावरमधील घटनेने त्यांच्यावर उलटले. प्रबळ लोकशाही असलेल्या आपल्या देशाला अहिंसेची परंपरा आहे. दहशतवादाची सध्याची परिस्थिती पाहता भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज, रविवारी येथे केले.
दक्षिण भारत जैन सभेच्या ९४ व्या अधिवेशनात विविध पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील मार्केट यार्डमधील शाहू सांस्कृतिक मंदिरातील या कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते.
उज्ज्वल निकम म्हणाले, अहिंसाप्रिय असल्याने आपण मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातून सावरलो. भगवान महावीर यांच्या अहिंसावादी तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासासाठी जैन बांधवांनी कार्यरत राहावे.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जैन समाजातील परंपरा उल्लेखनीय आहे. अॅड. गोविंद पानसरे म्हणाले, कम्युनिस्ट असलो, तरी धर्मतत्त्वांचे पालन करणाऱ्यांना मानतो.
कार्यक्रमात ‘करवीररत्न’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर पंडित सुशीलकुमार उपाध्ये, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांचा विशेष सन्मान केला.
सागर चौगुले, सुरेश रोटे, सुभाष चौगुले, डॉ. जे. एफ. पाटील, डी. सी. पाटील, नगरसेवक राजू लाटकर, अपर्णा आडके, किरण शिराळे, आदी उपस्थित होते.
डी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुकुमार बेळंके व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शेटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
यांचा झाला सन्मान...
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रा. साधना झाडबुके, राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जयकुमार उपाध्ये (नवी दिल्ली), मीना गरिबे (नाशिक), प्रा. धरणेंद्र कुरकुरी (कर्नाटक), डॉ. कुबेर मगदूम (इचलकरंजी), अजितकुमार भंडे (मालगाव), श्रीधर मेक्कळके (निपाणी), सुधा नेजे (भोज, कर्नाटक), वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
निकम म्हणाले...
४ समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे.
४ समाजाच्या तत्त्वांचे पालन होते का, याबाबत अंतर्मुख व्हावे.
४पैसा, श्रीमंती यांचे ओंगळवाणे प्रदर्शन टाळून गरजूंना मदत करावी.
४जैन समाजातील स्त्रियांना शिक्षणाकडे आकृष्ट करावे.
४प्रत्येक ठिकाणी विशिष्ट संरक्षण, आरक्षणाचा न्यूनगंड बाजूला सारावा.