सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर उड्डाणपुलाची गरज
By Admin | Updated: November 11, 2014 23:26 IST2014-11-11T21:15:53+5:302014-11-11T23:26:10+5:30
तलावाच्या स्थापनेपासून हीच स्थिती : तीन महिने पाण्यातूनच होते धोकादायक वाहतूक

सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर उड्डाणपुलाची गरज
अनिल पाटील - मुरगूड -मुरगूड शहरासह पंचक्रोशीत अनेक गावांना संजीवनी ठरलेला ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अधिकचे पाणी ज्याठिकाणी बाहेर पडते त्या सांडव्यावरती पुलाची आवश्यकता आहे. तलाव निर्मितीपासून आतापर्यंत या गोष्टीकडे कानाडोळा झाल्याने पावसाळ्यात कापशी, मुरगूड रस्त्यावर अंदाजे २०० मीटर पाणी वेगाने वाहते. या पाण्यातून जीव मुठीत धरून वाहनचालकांना प्रवास करावा लागतो.
संस्थानकाळात अत्यंत योग्य अशा ठिकाणी मुरगूड, यमगे, शिंदेवाडी, आदी गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी सर पिराजीराव तलावाची निर्मिती जयसिंगराव घाटगे यांच्या अधिपत्याखाली झाली. साधारणत: पाऊण टीएमसी पाणीसाठा तलावात साठतो. तलाव भरला की, तलावाच्या पश्चिमेला साधारणत: १५० ते २०० मीटर सांडवाव्यावरून वेगाने पाणी वाहते. हे पाणी गुडघाभर, तर काही ठिकाणी कमरेएवढे असते. हे पाणी मुरगूड-कापशी या मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने काहीवेळा या रस्त्यावरची वाहतूक ठप्प होते.
मुरगूड शहराची व्याप्ती पाहता, दौलतवाडी, करंजिवणे, हळदवडे, हळदी, बेलेवाडी, कापशी, अलाहाबाद, आदी अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात शहराशी संपर्क साधण्यासाठी लोकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. ही वाहतूक याच रस्त्यावरून होते. विशेषत: या प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे.
दोन वर्षांपासून शासकीय आय. टी.आय.सुद्धा या सांडव्याच्या पलीकडील बाजूसच बांधले आहे. या संस्थेतही साधारणत: २०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनाही दररोज या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. यामुळे महिलांची व मुलींची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने व दोन महिने रस्त्यावरून सलगपणे पाणी वाहल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ झाले आहे. यामुळे बऱ्याचवेळी याठिकाणी मोटारसायकल घसरून लहान-मोठे अपघात घडले आहेत. ज्यावेळी पाणी वाहत असते, त्यावेळी वाहने धुण्यासाठी, पाण्याची मजा पाहण्यासाठी हौशा-नवशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
या सर्वांचा विचार करता सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या या समस्येकडे आ. हसन मुश्रीफ आणि खा.धनंजय महाडिक यांनीही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मुरगूड नगरपरिषद आणि तलाव व्यवस्थापन कार्यालय यांनी याबाबतचे प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या कामाच्या पूर्ततेबाबत प्रयत्न करणे गरजेचे आहे.