‘निर्भया’ची गरज खेदजनक
By Admin | Updated: August 9, 2016 01:12 IST2016-08-09T01:04:38+5:302016-08-09T01:12:10+5:30
पालकमंत्र्यांचे परखड मत : प्रत्येकाने महिलांप्रती आदर बाळगावा; पथकाचा प्रारंभ

‘निर्भया’ची गरज खेदजनक
कोल्हापूर : कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची निर्मिती पोलिस दलास करावी लागते ही बाब वेदनादायी व दु:ख निर्माण करणारी आहे, असे परखड मत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वतीने महिला व युवतींच्या वाढत्या छेडछाडीविरोधात निर्माण केलेल्या ‘निर्भया’ पथकाच्या प्रारंभप्रसंगी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर होत्या.
पालकमंत्री पाटील म्हणाले, हे पथक निर्मिती म्हणजे आपण माता- भगिनींची सुरक्षितता आणि महिलांची समानता मानत नसल्याचेच धोतक आहे. सध्याचे दिवस हे कलियुगातील शेवटच्या काळाचेच आहेत असे म्हणावे लागेल. आजच्या काळात पोलिस दलातील काही लोकही अशा कृत्यात सहभागी होतात. त्यांचीही गय होता कामा नये. ज्या पद्धतीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पथकाची रचना केली आहे, त्यात प्रबोधन, समुपदेशन आणि ज्यादाच काम लागले तर दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. या पथकास पाच वाहने मागणीप्रमाणे दिली जातील. या छेडछाडीच्या मानसिकतेच्या मुळाशी जाऊन समूळ उच्चाटन करण्यासाठी जी हवी ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
विजया रहाटकर म्हणाल्या, घटना घडल्यानंतर सरकार अनेक उपाय करते. मात्र, घटना घडूच नये म्हणून उपाय योजना करणारे कोल्हापूर पोलिस दल एकमेव आहे. युवती, महिलांची छेडछाड वेळीच रोखली नाही तर मोठी घटना घडण्यास वेळ लागत नाही. म्हणून निर्भया पथकासारखा प्रयोग राज्यात सर्वत्र करावा.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, हैदराबाद येथील महिला सुरक्षा पथकाच्या धर्तीवर या पथकाची निर्मिती केली आहे. सध्या देशात २६ हजारांहून अधिक महिलांबाबतचे गुन्हे घडत आहेत, तर यात महाराष्ट्राचा क्रमांक चौथा लागतो. त्यामुळे या निर्भया पथकाची निर्मिती केली आहे. यात स्वत: पोलिस गुन्हा दाखल करणार आहेत. प्रत्येक शाळा, कॉलेज, चौक, टपऱ्या, आदी ठिकाणी हे पथक कार्यरत राहील.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, रस्त्यावरील ही लढाई आता घराघरांत नेण्याची गरज आहे. कारण घरातील महिलांना भ्रूण स्त्री जातीचे असेल तर गर्भपात करायला भाग पाडले जाते. त्यामुळे त्यांनाही सुरक्षित करण्याची गरज आहे. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, मधुरिमाराजे छत्रपती, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
अशी कारवाई;
असे समुपदेशन
जिल्ह्यात दहा पथकांची निर्मिती केली आहे. कोल्हापूर शहरातील चार पोलिस ठाणे, इचलकरंजी (शहर, ग्रामीण) , जयसिंगपूर, शाहूवाडी, गडहिंग्लज, कागल यांचा समावेश आहे. त्यात एक पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला कर्मचारी, तीन पुरुष कर्मचारी, एक चालक असे पथक आहे.
हे पथक कॉलेज, शाळा, नोकरी, आस्थापना, चौक, टपरी, गर्दीच्या ठिकाणी टेहळणी करणार आहे. त्यांच्या साथीला छुपे कॅमेरे दिले आहेत. छेडछाड करणाऱ्यास प्रथम ताब्यात घेऊन त्याची विहीत नमुन्यात माहिती व छायाचित्र घेतले जाणार आहे. मुलगा अज्ञान असेल तर त्याच्या आई-वडिलांना बोलावून समुपदेशन, प्रबोधन केले जाणार आहे.
तरुण असेल तर त्याला पालकांसमोर बोलावून प्रथम प्रबोधन केले जाणार आहे. दुसऱ्यांदा दंडुक्याचा वापर केला जाणार आहे. विवाहित तरुण असेल तर त्याच्या पत्नीला पोलिस ठाण्यात बोलावून त्याचे कृत्य सांगितले जाणार आहे. याशिवाय पत्नीसमोरच समुपदेशन केले जाणार आहे. स्वत: यात पोलिस गुन्हे दाखल करणार आहेत.