जगायला शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज
By Admin | Updated: September 20, 2014 00:29 IST2014-09-20T00:18:10+5:302014-09-20T00:29:24+5:30
अभय बंग यांचे प्रतिपादन : सदानंद कदम, सु. र. सुनिती यांना पुरस्कार प्रदान

जगायला शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज
गारगोटी : ‘जीवन हेच शिक्षण’ ही संकल्पना रुजविण्यासाठी म. गांधी, विनोबा भावे यांची भूमिका आणि डॉ. जे. पी. नाईक यांची प्रयोगशीलता समजून घेतली पाहिजे. जगावे कसे हे शिकवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
येथील इंजुबाई सांस्कृतिक हॉलमध्ये डॉ. जे. पी. नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कार वितरण समारंभ आज, शुक्रवारी झाला. त्यावेळी डॉ. बंग बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य डॉ. विजय निंबाळकर होते.
डॉ. बंग म्हणाले, सध्याची शिक्षणपद्धती शिक्षकांच्या सोयीसाठी निर्माण के लेली व्यवस्था आहे. केवळ चार भिंतीच्या आत उभे राहून माहिती सांगणारे शिक्षक नाहीसे झाले पाहिजेत. जीवनातील समस्या कशा सोडवायच्या, हे शाळेत शिकवायला हवे. लहान मुले रांगताना, चालताना, पळताना, सायकल चालविताना किंवा दैनंदिन क्रिया करताना कुणी शिकविले? तसेच शिक्षणही जीवन जगताजगता मिळायला हवे.
डॉ. जे. पी. नाईक प्राथमिक शिक्षक पुरस्कार सदानंद कदम (मिरज), तर डॉ. चित्रा नाईक समाजसेवा पुरस्कार सुनिती सु. र. (पुणे) यांना डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सदानंद कदम, सुनिती सु. र., डॉ. विजय निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. जयंत कळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. राजन गवस यांनी परिचय करून दिला. डॉ. उदय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, सहसंचालक संपत गायकवाड, खंडेराव घाटगे, प्रा. बी. टी. ढेरे, व्ही. जे. कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)