वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज

By Admin | Updated: April 9, 2015 00:14 IST2015-04-09T00:13:35+5:302015-04-09T00:14:20+5:30

माउली चौकातील परिस्थिती : उभारलेल्या सिग्नलला मुहूर्त कधी; दिशादर्शक फलक लावण्याची मागणी

The need to discipline traffic | वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज

वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज

संतोष मिठारी/ सचिन भोसले  - कोल्हापूर
नेहमी गजबजलेल्या माउली चौकातील वाहतुकीला शिस्त नाही. नुसतेच उभारलेले सिग्नल सुरू करण्याचा पत्ताच नाही. रस्त्यावर गतिरोधकांचा अभाव. पार्किंगचा बोजवारा उडालेला. शाहूनगरातील सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. कचरा उठाव वेळेवर होत नाही. पाणी अपुरे आणि कमी दाबाने मिळते, अशा अनेक तक्रारींचा पाढा माउली चौक परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’च्या व्यासपीठावर वाचला. राजारामपुरी येथील माउली चौक (बाईचा पुतळा) या ठिकाणी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ‘लोकमत टीम’ने परिसरातील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
माउली चौक हा परिसर दाटीवाटीचा आहे. शहरासह शिवाजी विद्यापीठ, सायबर, राजाराम कॉलेज अशा शैक्षणिक संस्थांकडे जाणारे रस्ते जोडणारा महत्त्वाचा चौक अशी त्याची ओळख आहे. याठिकाणी बसेस, एस. टी. आदींसह मोठ्या वाहनांची गर्दी असते. येथून बेशिस्तपणे वाहनांची ये-जा होते. त्यामुळे याठिकाणी वारंवार अपघातांचे प्रकार घडतात. या चौकात महानगरपालिका प्रशासनाने गेल्या चार महिन्यांपासून सिग्नल उभारले आहेत. पण, त्यांची सुरुवात करण्याचा मुहूर्त अद्यापही महानगरपालिकेने साधलेला नाही. वर्दळीचा चौक, रस्ते असतानाही याठिकाणी गतिरोधक करण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. हे दुर्लक्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने याठिकाणीचे सिग्नल त्वरित सुरू करावेत. विद्यापीठाकडून येणाऱ्या आणि शाहूनगर, राजारामपुरी मारुती मंदिराकडे जाणाऱ्या चौकातील मार्गांवर गतिरोधक करावेत. पार्किंगबाबत शिस्त लावावी. वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी येथे वाहतूक पोलिसाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. शाहूनाक्याकडे येणाऱ्या मार्गावरून पर्यटक चौकातूनच पुढे शहरात जातात पण, दिशादर्शक फलक नसल्याने त्यांचा गोंधळ उडतो. ते टाळण्यासाठी चौकात दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी सूचनादेखील त्यांनी केली. कचऱ्याचे आगार बनलेल्या चौकातील बसस्टॉप मागील मैदानाची स्वच्छता व्हावी. नवश्या मारुती चौकातील तुंबलेल्या गटारींची स्वच्छता व्हावी. शाहूनगरातील रस्त्यांची स्वच्छता व्हावी. कचरा उठाव वेळेवर करण्यात यावा. याठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरते शिवाय डासांचा प्रार्दुभाव वाढून आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली. या शौचालयाची दररोज स्वच्छता व्हावी तसेच येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा करावी तसेच माऊली चौक
परिसरात सुरू असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, राजारामपुरी १४ व्या गल्लीतील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत. शाहूमिल कॉलनी, शाहूनगरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून गेल्या अनेक वर्षांपासून गटर्स झालेल्या नाहीत. त्यांची पूर्तता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.


सिग्नल चालू करा
माउली चौकात वाहतुकीचा ताण असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतोे. सकाळी शाळा व कॉलेज भरण्या व सायंकाळी सुटण्याच्या वेळी चौकात गर्दी असते. त्यामुळे येथे कायमस्वरुपी सिग्नल सुरू ठेवावेत.
- मनोहर सोरप
वाहतुकीची कोंडी दूर करा
वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या चौकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारक कुठेही पार्किंग करतात. त्यामुळे नियमित वाहतुकीला अडचण निर्माण होते. त्यावर तोडगा काढावा.
- रवींद्र खोत
गतिरोधक बसवा
चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यापलीकडे जाताना जीव मुठीत घेऊन जावा लागतो तरी चौकात दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक बसवावेत.
- विनोद पोवार
पुतळ्याचे सुशोभीकरण
कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या व विद्येच्या माहेरघराकडे बोट दाखविणाऱ्या माउली पुतळा परिसराची आणि भागातील बगीच्यांची स्वच्छता व नूतनीकरण करावी. शहराचे हे वैभव जपण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत.
- अजित वरुटे
गटारी स्वच्छ करा
शाहूनगरातील स्वच्छतागृहे व गटारी वेळोवेळी साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित लक्ष द्यावे.
- परशुराम मोहिते
दिशादर्शक फलक
माउली चौकात बाहेरून येणारे पर्यटक थांबतात. मात्र, परिसरात महालक्ष्मी किंवा न्यू पॅलेस आदी ठिकाणी जाण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्याने कुठे जावे हे वाहनधारकांना समजत नाही तरी येथे दिशादर्शक फलक लावावेत.
- संजय सावंत
कोंडाळ्यांची स्वच्छता करा
शाहूनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील कचरा कोंडाळा वेळोवेळी उचलला जात नाही. त्यामुळे या परिसरात नागरिकांना नाक धरून चालावे लागते
- रामभाऊ कुराडे
बसथांबा पूर्ववत करा
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असल्याने त्यांना एमआयडीसी, कागल, विकासवाडी, विद्यापीठ आदी ठिकाणी परवडणाऱ्या दरात कागल-रंकाळा एस.टी.बसने जाता येते त्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करा.
- नीता पसारे
पथदिवे चालू करा
चौदावी गल्लीत पथदिवे सायंकाळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. तरी पथदिवे सुरू करावेत. महिलांना रात्री दिवे नसल्याने चालत किंवा गाडी घेऊन जाताना त्रास होतो.
- मेघा पसारे
दहा तास सिग्नल चालू
चौकात किमान दहा तासांहून अधिक काळ सिग्नल चालू करावेत. शहर वाहतूक शाखा व महापालिकेने त्वरित लक्ष घालावे.
- उज्ज्वला दळवी
अंतर्गत रस्ते करा
राजारामपुरी येथील अंतर्गत गल्ल्यांमधील रस्ते गेले कित्येक वर्षे केलेले नाहीत. त्यामुळे हे रस्ते त्वरित करावेत. परिसरातील गटारीही वेळोवेळी स्वच्छ होत नाहीत. तरी महापालिकेने लक्ष घालावे.
- बाबू पोवार
गटारींची सफाई करा
तेरावी गल्ली परिसरातील ड्रेनेज,गटारींची वेळोवेळी साफसफार्ई केली जात नाही.
- विकास पोवार

Web Title: The need to discipline traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.