पालिका कारभारात विश्वासार्हतेची गरज
By Admin | Updated: May 25, 2015 00:36 IST2015-05-24T22:24:49+5:302015-05-25T00:36:41+5:30
पक्षांना आत्मचिंतनाची गरज : इचलकरंजीत जनहिताचे प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक

पालिका कारभारात विश्वासार्हतेची गरज
राजाराम पाटील - इचलकरंजी -शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनदरबारी प्रलंबित असलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी नगरपालिकेची विश्वासार्हता पुन्हा संपादित होणे आवश्यक आहे. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा, शहर स्वच्छता आराखडा व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण असे नागरिक हिताचे प्रकल्प सुरू होतील.
नगरपालिकेत राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शहर विकास आघाडी यांचे अनुक्रमे २९, ११ व १७ असे नगरसेवक आहेत. त्यामध्ये माकप, डावी आघाडी अशा पक्षांचा समावेश नाही; पण कॉँग्रेसमध्ये आवाडे व डाळ्या, राष्ट्रवादीमध्ये कारंडे जांभळे आणि शहर विकास आघाडीमध्ये भाजप, शिवसेना व बंडखोर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडामुळे जानेवारीपासून ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणत सर्वच नगरसेवक सत्तेत आले.
कोणा एका पक्षाची किंवा आघाडीची सत्ता नसल्याने पालिकेच्या कामकाजात गोंधळ निर्माण झाला. पूर्वी मोजकेच नगरसेवक मक्तेदार होते. आता ‘ठेकेदार’ नगरसेवकांची संख्या वाढली आणि पालिकेच्या कारभाराचा बट्ट्याबोळ झाला. वाढलेली बजबजपुरी संपुष्टात आणण्यासाठी शहर विकास आघाडीचे संस्थापक - आमदार सुरेश हाळवणकर यांना जातीने मैदानात उतरावे लागले. त्यांनी तडक मुख्याधिकारी सुनील पवार यांच्या कार्यालयात येऊन झाडाझडती घेतली. नगरपालिका कार्यक्षेत्रातील बाह्यवळण रस्ता व शहरांतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी मिळालेले बारा कोटी रुपयांचे अनुदान थेट शासनाच्या पीडब्लूडी मार्फत खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही नगरपालिकेच्या गोंधळाच्या कारभाराला सणसणीत चपराक होती.
आता मात्र पालिकेत असलेल्या सर्व घटक पक्षावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. परस्परांशी समन्वय साधून नियोजनबद्ध कामे केल्यास नागरी सेवा-सुविधांची रस्ते, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीपुरवठा अशी कामे सुलभतेने होतील. त्यासाठी मात्र ठेकेदार पद्धत दूर ठेवली पाहिजे.
काळम्मावाडी पाणी योजना, घनकचरा व्यवस्थापन, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलचे आधुनिकीकरण, भुयारी गटर योजना, पाणी प्रक्रिया प्रकल्प असे प्रकल्पही आ. हाळवणकर यांच्यामार्फत आणि त्यांच्या पाठपुराव्याने कार्यान्वित करून घेणे अत्यावश्यक आहे.