राजकारणाचे गटार साफ करणे आवश्यक : वागळे
By Admin | Updated: January 18, 2015 00:29 IST2015-01-18T00:27:51+5:302015-01-18T00:29:01+5:30
सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान

राजकारणाचे गटार साफ करणे आवश्यक : वागळे
सांगली : समाजकारण आणि राजकारण यामध्ये काहीही फरक नसून, राजकारणाचे गटार साफ करण्यासाठी समाजकारण करणाऱ्या व्यक्तींनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने मराठा समाज भवन येथे आयोजित केलेल्या ‘लोकशाहीतील लोकांची भूमिका’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे, पत्रकार विनोद शिरसाठ, अॅड. अमित शिंदे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
निखिल वागळे म्हणाले, सध्याचे राजकारण चांगले नाही, असे म्हणून शांत राहून उपयोग नाही. सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे. दुर्देवाने आज कित्येक लोकप्रतिनिधींना विचारधारेशी काहीही संबंध नसतो. जेथे सत्ता असते तेथे जाणेच अनेकजण पसंत करतात. त्यामुळेच आजकाल राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक जिंकणारी यंत्रे झाली आहेत. ही परिस्थिती बदलण्याकरिता आपणच प्रयत्न केला पाहिजे. समाजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात प्रत्येकाने आवाज उठविला पाहिजे. एकदा मतदान केले म्हणजे आपले कर्तव्य संपले, असा विचार करून उपयोग नाही. निवडून आलेली व्यक्ती ही जनतेची सेवक आहे. याची जाण प्रथम नागरिकांनी ठेवली पाहिजे आणि कामांचा हिशेब लोकप्रतिनिधींकडे मागितला पाहिजे. आजकाल समाजात शिक्षित लोकांची संख्या वाढली असली तरी, त्यामध्ये सुसंस्कृत व्यक्तींची मात्र कमी आहे. चांगल्या कामांची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे असल्याचेही वागळे यांनी सांगितले. यावेळी राहुल माने यांचा सत्कार झाला. (प्रतिनिधी)