दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज
By Admin | Updated: August 31, 2014 23:37 IST2014-08-31T23:19:39+5:302014-08-31T23:37:30+5:30
अनंत दीक्षित : सोमनाथ अवघडे, कुमार दाभाडे, शमवेल मिसाळ, आवळे, साठे ‘समाजरत्न पुरस्कारा’ने सन्मानित

दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज
कोल्हापूर : दुर्बल, वंचितांना विकासाचा शाश्वत मार्ग दाखविण्यासाठी ज्ञानासह त्यांच्या मूलभूत गरजा भागविणाऱ्या व्यवस्थेची निर्मिती होणे गरजेचे आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी आज, रविवारी येथे केले.
सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त डॉ. मच्छिंद्र सकटे लिखित ‘देशाबाहेर’ या पुस्तकाचे प्रकाशन, समाजरत्न पुरस्कार वितरण या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात दलित महासंघाचा हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सकटे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. विश्वनाथ शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल गवळी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी ज्या उद्देशाने रशियाला भेट दिली, तोच धागा पकडत मच्छिंद्र सकटे यांनी वीस वर्षांपूर्वी जर्मनी गाठली. त्यांनी याठिकाणी मातंग समाजाचे विवेचन केले. नुसताच दौरा न करता तेथील वास्तवदेखील त्यांनी ‘देशाबाहेर’मधून मांडले आहे. देश शस्त्रसंपन्न, महासत्ता झाला पाहिजे. त्यावर चर्चा होते. मात्र, दुर्बल, वंचितांच्या मूलभूत प्रश्नांवर, त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत फारसे काही होत नाही. ते झाले, तरच आपले महासत्ता होण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. त्यासाठी सकटे यांच्यासारख्या समाजातील सर्वच घटकांतून नेतृत्व पुढे यावे.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘देशाबाहेर’द्वारे लेखकाने माणसे शोधण्याचा, जपण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही स्वत:चे घर, रेशनकार्ड, मतदारयादीत नाव नसलेल्या अनेक छोट्या जमाती आहेत. त्यांना स्थिरस्थावर करण्याचे काम मोठ्या जमातींनी करावे.
डॉ. गवळी म्हणाले, गावकुसाबाहेर नव्हे, तर देशाबाहेर आपण बघितले पाहिजे, असा समाजाला संदेश देणारे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यानंतर लेखक हा कष्टकऱ्यांचा असल्याचे जाणवते.
डॉ. सकटे म्हणाले, मातंग समाजात क्षमता, ताकद आहे. मात्र, ठोस निर्णय घेतला जात नाही. विविध क्षेत्रांत आमच्या समाजातील मुलांनी कौशल्य दाखविले आहे.
सकटे दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशक अनिल म्हमाणे, बाबासाहेब दबडे, अमोल महापुरे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष लालासाहेब नाईक यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
'देशाबाहेर' पुस्तकाचे प्रकाशन
‘देशाबाहेर’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, निवृत्त अध्यापक कुमार दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते शमवेल मिसाळ, विकास आवळे, डॉ. शिवाजीराव साठे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. आवळे व साठे यांच्यावतीने त्यांच्या नातेवाइकांनी पुरस्कार स्वीकारला.