पवारांच्या दौऱ्यापूर्वी शहर राष्ट्रवादीतील अस्वस्थता उघड
By Admin | Updated: January 11, 2016 01:09 IST2016-01-11T00:54:59+5:302016-01-11T01:09:13+5:30
खलबते : आर. के. पोवार समर्थकांची पन्हाळा येथे बैठक

पवारांच्या दौऱ्यापूर्वी शहर राष्ट्रवादीतील अस्वस्थता उघड
कोल्हापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक होऊन नऊ महिने झाले तरी शहरात कार्यकारिणी निवड झालेली नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल शहर राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांत कमालीची खदखद असून, आगामी काळात याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याबाबत रविवारी माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या समर्थकांची ऐतिहासिक पन्हाळगडावर बैठक होऊन यामध्ये आगामी दिशा ठरविण्यात आल्याचे समजते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी पक्षांतर्गत या घडामोडीला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक नऊ महिन्यांपूर्वी झाली. यामध्ये आर. के. पोवार व राजू लाटकर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. क्रियाशील सभासदांनी पोवार यांनाच पसंती दिली होती, पण आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण कार्यकर्त्याला संधी द्यायची म्हणून राजू लाटकर यांची निवड करण्यात आली. गेल्या नऊ महिन्यांत लाटकर यांनी शहराची कार्यकारिणी केलेली नाही, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. याउलट जिल्हाध्यक्षांनी जिल्हा कार्यकारिणीसह तालुका कार्यकारिणी पूर्ण करून त्यांना सक्रिय केले आहे. शहराच्या कार्यकारिणीला अद्याप मुहूर्त मिळत नाही. त्याचबरोबर शहरातील निर्णय घेताना जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी भावना आर. के. पोवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. स्थानिक नेत्यांकडे याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही ते दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रविवारी सकाळी आर. के. पोवार समर्थकांची बैठक पन्हाळगडावर झाली. यामध्ये कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांच्या कारभाराचा पाढाच वाचला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तळागाळातील कार्यकर्त्यांनी घाम गाळल्यानेच पक्ष वाढला, पण त्याच कार्यकर्त्यांना कोणी बेदखल करत असेल, तर ते सहन केले जाणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्याचे समजते.
पक्षाध्यक्ष शरद पवार १७ व १८ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोवार समर्थकांची झालेली बैठक महत्त्वाची आहे. १८ जानेवारीला सकाळी पवार यांची भेट घेऊन कार्यकर्ते मनातील खदखद व्यक्त करणार असल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या खदखदीची दखल नेत्यांनी घेतली नाही, तर भविष्यात पक्षांतर्गत उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीला माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला शहराध्यक्षा वहिदा मुजावर, अनिल घाटगे, निरंजन कदम, लाला जगताप, गणपतराव बागडी, पद्मा तिवले, जयकुमार शिंदे, सुनील देसाई, रमेश पोवार यांच्यासह शंभरहून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पन्हाळगडावर आयोजित केला होता. त्यासाठी सगळे एकत्र आले होते, दुसरे कोणतेही कारण नाही.
- आर. के. पोवार, माजी शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस