राष्ट्रवादी काँग्रेसची ‘वेळ’ चुकली
By Admin | Updated: November 19, 2015 01:13 IST2015-11-19T00:56:37+5:302015-11-19T01:13:16+5:30
जि. प.तील सहभाग धुसरच : विधानपरिषदेचा समझोता प्रदेश पातळीवरच

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘वेळ’ चुकली
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या सत्तेत वाटा द्यावा, यासाठी काँग्रेसवर दबाव टाकण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची वेळ चुकली. महापालिका सत्तेच्या खेळात राष्ट्रवादीने आपले जिल्हा परिषदेचे प्यादे पुढे करून काँग्रेसचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित त्यात यश आले असते. वर्षावर आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका,
पाच वर्षे सोबत ठेवण्याचा ‘स्वाभिमानी’ला दिलेला शब्द, यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादी सहभागी होण्याची शक्यता फारच धुसर आहे.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकामेकांविरोधात लढले होते. त्यावेळीही महापालिकेसारखीच त्रिशंकू अवस्था झाली होती. काँग्रेस आपल्याला बरोबर घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटले; पण कॉग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. चार वर्षे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सदस्यांची दमछाक केली आहे. निधी वाटप असो अथवा इतर कामांमध्ये दुजाभावाची वागणुकीने राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जेमतेम वर्ष बाकी आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह समिती सभापतींची सव्वा वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे नवीन निवडी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला करून उर्वरित एक वर्ष राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घ्यावे, असा राष्ट्रवादीच्या सदस्यांचा प्रयत्न आहे; पण काँग्रेस ‘स्वाभिमानी’ला बाजूला ठेवणार नाही, हे निश्चित आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जरी मागणी केली असली, तरी नेते किती ताकद लावणार यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सदस्यांनी मागणी केली असली, तरी या निवडणुकीबाबत प्रदेश पातळीवर अगोदरच समझोता झाला आहे. त्यामुळे सदस्य अथवा स्थानिक नेत्यांच्या होय, नाहीला महत्त्व नाही. याऐवजी महापालिका सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक होती. तिथेच काँग्रेसचे नाक दाबले असते, तर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे तोंड निश्चितच उघडले असते; पण ते सध्या तरी शक्य नाही. त्यात राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील व धैर्यशील माने सोडले, तर एकाही नेत्याच्या घरातील अथवा जवळचा सदस्य नाही. कार्यकर्त्यांसाठी कोणी ताकद खर्च करेल, असे वाटत नाही.
जाच कमी करण्यासाठीच प्रयत्न
बहुतांश मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रबळ उमेदवारांना पराभूत करूनच काँग्रेसचे सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीला पाण्यात बघत आहेत. निधी वाटपासह गेली ४ वर्षे सापडेल त्या ठिकाणी उट्टे काढण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. आता सत्तेत सहभागी नसेना; पण उर्वरित काळात निधी वाटपातील जाच कमी व्हावा, यासाठीच राष्ट्रवादीच्या सदस्यांची ही धडपड आहे.
विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच मुदतवाढ?
विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी संपत आला आहे. निवडी करताना नेत्यांनी सव्वा वर्षानंतर दुसऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन दिले होते; पण आजपर्यंतचा दोन्ही काँग्रेसचा इतिहास पाहता विद्यमान पदाधिकारीच उर्वरित कालावधीसाठी कायम राहतील अशी शक्यता आहे.