गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची ‘वेळ’ फिरली

By Admin | Updated: July 8, 2015 00:04 IST2015-07-08T00:04:33+5:302015-07-08T00:04:33+5:30

साडेतीन वर्षांची सत्ता संपुष्टात : हसन मुश्रीफांवर नामुष्कीची वेळ; नगराध्यक्षपदी जनता दलाचे राजेश बोरगावे

NCP's 'time' in Gadhinglaj rotates | गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची ‘वेळ’ फिरली

गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीची ‘वेळ’ फिरली

गडहिंग्लज : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनता दलाने ९ विरुध्द ८ मतांनी बाजी मारुन गडहिंग्लज नगरपरिषदेतील राष्ट्रवादीची साडेतीन वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीत राजेश बोरगावे विजयी झाले. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नामुष्कीची वेळ आली.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षा सुंदराबाई बिलावर यांनी विरोधी आघाडीच्या राजेश बोरगावे यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार अरुणा शिंदे यांचा
९ विरुद्ध ८ मतांनी पराभव झाला. त्यामुळे सत्तांतरानंतर नगरपरिषदेवर पुन्हा जनता दलाचा झेंडा फडकला.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या निवडणुकीत साडेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीचा पाडाव करून राष्ट्रवादी सत्तेवर आली होती. सभागृहात राष्ट्रवादीचे ९, तर विरोधी आघाडीचे ८ नगरसेवक आहेत. त्यापैकी एक ‘जनसुराज्य’चा आहे.
पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी व त्यानंतरच्या अडीच वर्षांसाठी इतर मागास प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. काठावरील बहुमतामुळे वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडीप्रसंगी राष्ट्रवादीला ‘जनसुराज्य’च्या नगरसेवकाची मदत घ्यावी लागली होती.
इच्छुक अन्य दोन्ही महिलांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याच्या हेतूने विद्यमान नगराध्यक्षांचा राजीनामा राष्ट्रवादीने घेतला होता, त्यामुळे ही निवडणूक झाली. मात्र, या निवडणुकीत नगरसेविका बिलावर यांनी विरोधी जनता दलाचे उमेदवार बोरगावे यांना मतदान केल्यामुळे अखेर राष्ट्रवादीवर सत्ता गमावण्याची वेळ आली.
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजसह कागल, मुरगूड व पन्हाळा या चार नगरपरिषदांमध्ये आमदार मुश्रीफ यांची सत्ता होती. त्यापैकी ‘गडहिंग्लज’ नगरपरिषदेच्या सत्तेवर त्यांना पाणी सोडावे लागले. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सत्तांतरात भाग घेतल्यामुळेच त्यांना हा फटका बसल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. (प्रतिनिधी)


‘लोकमत’चा अंदाज खरा ठरला
‘लोकमत’ने गडहिंग्लज नगराध्यक्ष निवडीच्या घडामोडीत सोमवारच्या अंकात ‘राष्ट्रवादीच्या बिलावर विरोधकांच्या छावणीत’, तर मंगळवारच्या अंकात ‘गडहिंग्लजमध्ये सत्तांतर शक्य’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार नगरपरिषदेत सत्तांतर झाले. सुमारे १२५ वर्षांच्या इतिहासात गडहिंग्लज पालिकेत पहिल्यांदाच अशा पध्दतीने सत्तांतर झाले. यामुळे ‘लोकमत’च्या रोखठोक बातम्यांची गडहिंग्लज शहरासह जिल्ह्यात विशेष चर्चा झाली. ‘लोकमत’च्या बातम्यांचे झेरॉक्सही वाटण्यात आले. नगराध्यक्ष निवडीची बातमी कळताच मंगळवारी अनेकांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन करुन अचूक अंदाजाबद्दल 'लोकमत'चे अभिनंदन केले.


‘जद’ची राज्यातील एकमेव नगरपरिषद
अलीकडच्या काळात जनता दलाची राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पीछेहाट झाली असली तरी गडहिंग्लज तालुक्यात पक्षाचा प्रभाव कायम आहे. गेल्या चाळीस वर्षांतील तीन निवडणुकांचा अपवाद वगळता गडहिंग्लज नगरपरिषद जनता दलाकडेच राहिली आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर नगराध्यक्ष निवडीतील ऐतिहासिक सत्तांतराने ही नगरपरिषद पुन्हा जनता दलाकडे आली आहे. जनता दलाचा झेंडा लागलेली गडहिंग्लज ही राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे.

माजी नगराध्यक्षांत झाली लढत
तीन वर्षांपूर्वीच्या जनता दल-जनसुराज्य आघाडीच्या कारकिर्दीत जनता दलाचे बोरगावे यांना दोन वर्षे व शिंदे यांना सहा महिने नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर शिंदेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे यावेळी दोन माजी नगराध्यक्षांमध्ये ही लढत झाली.

Web Title: NCP's 'time' in Gadhinglaj rotates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.