चंदगडमध्ये वर्चस्वासाठी राष्ट्रवादीची धडपड !
By Admin | Updated: January 16, 2017 00:37 IST2017-01-16T00:37:37+5:302017-01-16T00:37:37+5:30
जोरदार व्यूहरचना : तिन्ही तालुक्यांत स्वबळावर लढण्याचे प्रयत्न, सत्ताधाऱ्यांसमोर ‘आव्हान’, विरोधकांना ‘संधी

चंदगडमध्ये वर्चस्वासाठी राष्ट्रवादीची धडपड !
राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड, तर राष्ट्रवादीला रोखण्याची जोरदार व्यूहरचना चंदगड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. किंबहुना, आगामी विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीमच आहे. गेल्यावेळी बाबासाहेब कुपेकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय मोठ्या दूरदृष्टीने आणि हिमतीने घेतला. त्याला चांगले यशही मिळाले होते. मात्र, त्यांच्या पश्चात होणारी जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसमोर ‘आव्हान’ आणि विरोधकांना एक ‘संधी’च आहे. गेल्यावेळी चंदगडमध्ये नगरसिंगराव पाटील व भरमूअण्णा पाटील हे दोघेही कुपेकरांच्या विरोधात एकत्र आले, तर गोपाळराव पाटील यांनी ‘तटस्थ’पणाची भूमिका घेतली. त्यावेळी जि. प.च्या पाचपैकी भरमूअण्णा गटाला तीन, तर नरसिंगराव व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. पंचायत समितीच्या दहापैकी राष्ट्रवादीला चार, तर नरसिंगराव व भरमूअण्णा गटाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. युतीमुळे चंदगड पंचायत समितीवर भरमूअण्णा व नरसिंगराव गटाचीच सत्ता आली. गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचपैकी पाचही जागा राष्ट्रवादीनेच जिंकल्या होत्या. पंचायत समितीच्या १0 पैकी ८ राष्ट्रवादीला, तर जनता दल व जनसुराज्यला एक जागा मिळाली होती. या बहुमताने पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीनेच आबाधित राखली होती. आजरा तालुक्यातील कोळिंद्रे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. केसरकरांच्या रूपाने आजऱ्याचे सभापतिपदही कुपेकर गटाला मिळाले. राष्ट्रवादीचं काय चाललंय? गडहिंग्लज व आजरा साखर कारखान्यातील काँग्रेसची आणि गडहिंग्लज कारखान्यातील जनता दलाबरोबरची युती या निवडणुकीतही कायम ठेवण्याबरोबरच चंदगडमध्ये गोपाळरावांशी मैत्री करून वर्चस्व अबाधित राखण्यासाठी ‘खेळी’ राष्ट्रवादीकडून सुरू आहे. कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागा अबाधित राखण्याचे आव्हान आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर आहे. नव्याने उदय झालेल्या अप्पी पाटील गटाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असून, त्यांच्यासह शिवसेनेच्या संग्रामसिंह कुपेकरांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रयत्नाने झालेली विकासकामे आणि डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘एव्हीएच’ प्रकल्प हटविण्यात आलेले यश ही जमेची बाजू आहे. मात्र, बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लज विभागातील सात जागा स्वबळावर जिंकून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला दिलेली संधी अबाधित राखण्याचे आव्हान संध्यादेवींच्यासमोर आहे.