गडहिंग्लज प्रांत कचेरीवर राष्ट्रवादीचा मोर्चा
By Admin | Updated: November 12, 2014 23:26 IST2014-11-12T22:10:36+5:302014-11-12T23:26:37+5:30
कुराडे बंगला हल्ला प्रकरण : आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

गडहिंग्लज प्रांत कचेरीवर राष्ट्रवादीचा मोर्चा
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष व नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे यांच्या बंगल्यावर हल्ला करून त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बँक, कांबळे तिकटी, मेन रोड, आयलँड मार्गे दसरा चौकाला वळसा घालून प्रांतकचेरीवर मोर्चा आला. भ्याड हल्लेखोरांचा निषेध असो, समाजकंटकांना अटक करा, आरोपींना कडक शिक्षा द्या, अशी घोषणाबाजी करण्यात आली. निषेध सभेनंतर साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष उदयराव जोशी म्हणाले, गडहिंग्लजच्या सामाजिक व राजकीय परंपरेला काळिमा लावणारा हा प्रकार आहे.
प्रा. आशपाक मकानदार म्हणाले, दलित कार्यकर्त्यांच्या घरावरील हल्ला हा घातपाताचा पूर्वनियोजित कट आहे. त्यास राजकीय रंग आणि वास असण्याची शक्यता आहे.
सतीश पाटील म्हणाले, समाजविघातक प्रवृत्तींना खतपाणी मिळू नये यासाठी आरोपींना तत्काळ अटक करावी.
नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, ‘दानिविप’चे संस्थापक अध्यक्ष रमजान अत्तार, कुदनूरचे दलित कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे यांचीही भाषणे झाली.
मोर्चात उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते कुराडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा. रमेश पाटील,
राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष सुनील गुरव, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली, श्री शिवाजी मराठा मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक किरण कदम, माजी नगराध्यक्षा मंजूषा कदम व निरूपमा बन्ने, राजेश पाटील-औरनाळकर, राहुल पाटील, बाळासाहेब घुगरे, युवराज पाटील, राजेंद्र तारळे, विनोद बिलावर, दादा मोहिते, आण्णासाहेब गाताडे यांच्यासह राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, गाळेधारक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गडहिंग्लज प्रांतकचेरीवर राष्ट्रवादीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, मंजूषा कदम व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते. दुसऱ्या छायाचित्रात प्रांत कचेरीत प्र.शिरस्तेदार एल. जे. पाटील यांना निवेदन देताना विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर व जनता दलाचे नगरसेवक.
विरोधी आघाडीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; घटनेचा निषेध, सखोल चौकशीची मागणी
नगरपालिकेतील विरोधी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीतर्फे साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. खेमणार यांना शिष्टमंडळाने भेटून निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादीचे नगरसेवक कुराडे यांच्या घरी अज्ञातांनी केलेल्या जाळपोळीचा निषेध करून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर, शिक्षण मंडळ उपसभापती राजू जमादार, सदस्य जितेंद्र पाटील, नगरसेवक दादू पाटील, राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, बाळासाहेब वडर, नितीन देसाई, उदय पाटील, सरिता भैसकर, आदींसह महेश कोरी, सागर पाटील यांचा समावेश होता.