आजरा तालुका संघावर राष्ट्रवादीचा झेंडा

By Admin | Updated: July 28, 2015 01:22 IST2015-07-28T01:22:26+5:302015-07-28T01:22:44+5:30

शाहू आघाडीचा दारुण पराभव : रवळनाथ विकास आघाडीचे वर्चस्व

NCP's flag at Azara Taluka Sangh | आजरा तालुका संघावर राष्ट्रवादीचा झेंडा

आजरा तालुका संघावर राष्ट्रवादीचा झेंडा

आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने राष्ट्रवादीच्या श्री रवळनाथ विकास आघाडीने अशोक चराटी, रवींद्र आपटे, अंजना रेडेकर व शिवसेनेचे संभाजी पाटील यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळविला. शाहू आघाडीला १९ पैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.
प्रचंड चुरशीने पार पडलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया येथील अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहात पार पडली. सर्वप्रथम इतर संस्था गटांचे मतदान मतमोजणीस घेण्यात आले. यामध्ये रवळनाथच्या संभाजी पाटील (हत्तिवडे) यांनी विजयाचे खाते उघडले. त्यानंतर सेवा संस्था गटाच्या मतमोजणीमध्ये सातपैकी सहा जागांवर विजय मिळवित ‘रवळनाथ’ पॅनेलने विजयी घोडदौड कायम ठेवली. महादेव पाटील-धामणेकर यांची एकमेव जागा वगळता इतरत्र शाहू आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निकालाचा कल शेवटपर्यंत सत्तारूढ आघाडीच्या बाजूने राहिला.
सहायक निबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३० टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
श्रीपतराव देसाई, अशोक चराटी, रवींद्र आपटे व अंजनाताई रेडेकर यांच्या दृष्टीने हा निकाल धक्कादायक समजला जातो. भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार व जयवंतराव शिंपी यांनी जिल्हा बँकेतील पराभवाचे उट्टे काढले. (वार्ताहर)

विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढीलप्रमाणे
विकास सेवा संस्था - बाळासाहेब आजगेकर (४९), आप्पासाहेब देसाई (४५), मुकुंदराव तानवड (४५), विठ्ठल देसाई (४५), धोंडिराम परीट (४८), राजाराम पाटील (४८), महादेव पाटील-धामणेकर (४६). व्यक्ती सभासद गट - देसाई मधुकर कृष्णाजी (४२३४), सुधीर राजाराम देसाई (४४२५), महादेव जोतिबा हेब्बाळकर (४१०८), गणपती विष्णू सांगले (४१०६), नारायण नाना सावंत (४१९६), तांबेकर संभाजी मारुती (३९३३). इतर मागास प्रतिनिधी - गोविंद नारायण पाटील (४४७५), भटक्या विमुक्त जाती जमाती शिवानंद अर्जुन पाटील (४६१०). अनु. जाती जमाती प्रवर्ग - निवृत्ती जानबा कांबळे (४७१२). इतर संस्था प्रवर्ग - संभाजी पाटील (हत्तिवडे ६१).
महिला राखीव प्रवर्ग : देसाई राजलक्ष्मी अजित (४५४९), मायादेवी पांडुरंग पाटील (४३१०).

Web Title: NCP's flag at Azara Taluka Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.