कॉँग्रेसच्या वजाबाकीने राष्ट्रवादीची बेरीज चुकणार

By Admin | Updated: September 7, 2014 00:24 IST2014-09-07T00:23:25+5:302014-09-07T00:24:08+5:30

विधानसभा निवडणूक : वाळवा-शिराळ्यातील राजकीय समीकरण बदलणार

The NCP's addition to the Congress's subtraction may be wrong | कॉँग्रेसच्या वजाबाकीने राष्ट्रवादीची बेरीज चुकणार

कॉँग्रेसच्या वजाबाकीने राष्ट्रवादीची बेरीज चुकणार


अशोक पाटील / इस्लामपूर
गत विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक, पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक, अभिजित पाटील, सी. बी. पाटील यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असला, तरी यावेळी मात्र सी. बी. पाटील वगळता अन्य नेते आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वजाबाकीने राष्ट्रवादीची बेरीज चुकणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदींची हवा झाल्याने आघाडी कॉँग्रेसच्या नेत्यांनी त्याचा धसका घेतला आहे. राजकारणात आपली खुर्ची भक्कम करण्यासाठी शिराळा मतदारसंघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी महायुतीत जाऊन विधानसभा लढविण्याचा निर्धार केला आहे. तर पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांनी कोल्हापूरच्या राजकारणात केलेली चूक सुधारून इस्लामपूर मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच काँग्रेसपासून फारकत घेतली आहे, तर सी. बी. पाटील हे कॉँग्रेसचे एकनिष्ठ असल्याचे दाखवून विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे नेतृत्व मानत आहेत. या नेत्यांच्या एकंदरीत भूमिकेमुळे राष्ट्रवादीला मिळणारी ताकद कमी झाली आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात आपला मुक्काम वाढविला आहे.
इस्लामपूर मतदारसंघात कॉँग्रेसची ताकद अल्प आहे. वाळवा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, वैभव पवार यांची भूमिका कॉँग्रेस पक्षाशी ठाम असली, तरी आघाडीचा धर्म पाळला जाईल किंवा नाही, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. गत विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी मौन पाळले असले, तरी त्यांच्याच घरातील युवा नेते गौरव नायकवडी यांनी मात्र महायुतीला ताकत देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातच जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक भीमराव माने हेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच झालेली दिसते.
शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार मानसिंगराव नाईक यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धारच केला आहे. परंतु त्यांना मदत करणारे कॉँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनीही कॉँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीची बिघाडी होते की काय, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. कॉँग्रेसचा नादच सोडून शिवाजीराव नाईक यांनी महायुतीतून आपली उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे याही मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
गत विधानसभेतील मतांचे गणित आणि यंदाच्या निवडणूकपूर्व राजकीय हालचालींचे त्यावर होणारे परिणाम यांचा विचार आता राजकीय पटलावरील प्रस्थापित नेत्यांकडूनही सुरू झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: The NCP's addition to the Congress's subtraction may be wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.