राष्ट्रवादी आज फुंकणार रणशिंग
By Admin | Updated: July 15, 2014 00:30 IST2014-07-15T00:25:03+5:302014-07-15T00:30:18+5:30
निर्धार मेळावा : अजितदादा, सुनील तटकरे कोल्हापुरात

राष्ट्रवादी आज फुंकणार रणशिंग
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या, मंगळवारी निर्धार मेळावा कोल्हापुरात होत आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना रिजार्च करत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश नेतेमंडळी स्वबळाची भाषा करत एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. महाराष्ट्रात ‘नंबर वन’ होण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने राज्यभर निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. काँग्रेसच्यावतीनेही विधानसभेची तयारी सुरू केली असून त्यांचे निरीक्षक दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा कोल्हापुरात मंगळवारी मेळावा होत असून या ठिकाणी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष पुन्हा स्वबळाची भाषा करणार की कॉँग्रेसशी जुळवून घेण्याचा सल्ला देणार, याबाबत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उद्या सकाळी साडेदहा वाजता विमानाने कोल्हापुरात येणार आहेत तेथून ते थेट शाहू सांस्कृतिक भवन, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील निर्धार मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत मेळावा होणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे स्थानिक प्रसारमाध्यमांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींशी ते संवाद साधणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळाखे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)