राष्ट्रवादीमध्ये फेरबदलाचे वारे

By Admin | Updated: November 28, 2014 23:43 IST2014-11-28T23:13:33+5:302014-11-28T23:43:10+5:30

पक्षांतर्गत निवडणूक : शहराध्यक्षपदासाठी फरास, लाटकर आघाडीवर

NCP revolutions | राष्ट्रवादीमध्ये फेरबदलाचे वारे

राष्ट्रवादीमध्ये फेरबदलाचे वारे

राजाराम लोंढे- कोल्हापूर -लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्ष बॅकफूटवर आल्याने गावपातळीपासून प्रदेशपातळीपर्यंत पक्षात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यातच डिसेंबर २०१४ मध्ये पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असल्याने पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. त्यातून पक्षात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. कोल्हापूर शहराध्यक्षपदासाठी तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू असून, नगरसेवक आदिल फरास व राजू लाटकर यांची नावे आघाडीवर आहेत. युवक जिल्हाध्यक्षपदासाठी रामराजे कुपेकरांचे नाव चर्चेत आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा सपाटा लावला आहे. राज्यातील सरकार अस्थिर असल्याने मध्यावधी निवडणुकीची शक्यता गृहीत धरून श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे ४१ आमदार निवडून आले असले तरी तब्बल ७१ ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते; त्यामुळे या जागांवर अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. पराभव झालेल्या प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल त्यांनी मागवून घेतला आहे. उमेदवारांचे काय चुकले यावर विचारमंथन करून आगामी निवडणुकीची व्यूहरचना आखली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रदेशपातळीपासून गावपातळीवरील कमिट्यांमध्ये फेरबदल करून पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राष्ट्रवादीची मागील पक्षांतर्गत निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. तीन वर्षांचा कालावधी झाल्याने पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रियेंतर्गत पहिल्यांदा प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणीचा कार्यक्रम राबविणार आहे. त्यातून निवडणूक घेऊन तालुक्यापासून प्रदेश पातळीपर्यंतच्या निवडी केल्या जातात. जिल्हाध्यक्ष पदावर सध्यातरी के. पी. पाटील यांच्याशिवाय पक्षाकडे त्या ताकदीचा दुसरा चेहरा दिसत नाही. बदल करायचा म्हटला तर भैया माने, ए. वाय. पाटील, मानसिंग गायकवाड ही नावे पुढे येतात. युवक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत संग्राम कुपेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप पाटील यांना संधी दिली; पण ते आक्रमकपणे काम करू शकलेले नाहीत. रामराजे कुपेकर हा पर्याय राष्ट्रवादीसमोर असू शकतो. कुपेकर यांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांचे चांगले संघटन बांधले आहे. त्यांच्या या संघटनात्मक कौशल्याचा फायदा घेण्यासाठी कुपेकर यांचे नाव निश्चित होऊ शकते. त्याला खासदार धनंजय महाडिक यांचेही पाठबळ मिळेल.
शहराध्यक्ष पदावर तरुण चेहऱ्याला संधी मिळणार हे निश्चित आहे. यासाठी आदिल फरास व राजू लाटकर हे पर्याय पक्षासमोर आहेत. महिला जिल्हाध्यक्षांसह सर्वच सेलच्या जिल्हाध्यक्षांमध्ये खांदेपालट केली जाणार असून, त्यासाठी ताकदीच्या व्यक्तींंचा शोध घेतला जात आहे.


यड्रावकरांकडे महत्त्वाची जबाबदारी?
पक्षांतर्गत कुरघोड्या होऊनही राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभा निवडणुकीत मारलेली मुसंडी पक्षीय पातळीवर त्यांचे महत्त्व वाढविणारी ठरली आहे. ते सध्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. ते कायम ठेवत त्यांच्यावर जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी देण्याबाबतही विचार सुरू आहे.

Web Title: NCP revolutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.