कागल मतदारसंघात राष्ट्रवादीच नंबर वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:15+5:302021-01-25T04:24:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची नंबर वन असून, ६६३ सदस्यांपैकी ३२० राष्ट्रवादी ...

कागल मतदारसंघात राष्ट्रवादीच नंबर वन
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची नंबर वन असून, ६६३ सदस्यांपैकी ३२० राष्ट्रवादी तर २१० शिवसेना, मित्रपक्षांचे सदस्य असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, सदस्य युवराज पाटील, भय्या माने, वसंतराव धुरे, मनोज फराकटे, शिल्पा खोत यांनी पत्रकातून केला.
‘शाहू’ कारखाना कार्यक्षेत्रात टीका करणाऱ्या भाजप नेतृत्वाने काय दिवे लावले, याबाबत ते काहीच बोलत नाहीत. लिंगनूर दुमाला, करनूरल वंदूर, व्हन्नूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, शेंडूर, पिंपळगाव बुद्रूक, साके या गावांतून जनतेने भाजपला हद्दपार केले. उलट सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यक्षेत्रात काय झाले? याची विचारणा करत आहेत. येथे हसूर खुर्द वगळता माद्याळ, आलाबाद, वडगाव, मांगनूर, बेलेवाडी मासा, तमनाकवाडा, बोळावीवाडी, करंजीवणे, लिंगनूर कापशी, गलगले, मेतके या सेनापती कापशी खोऱ्यातील गावांमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी व मित्रपक्षांची सत्ता आल्याचे पत्रकात म्हटले आहे.
‘ए. वाय.’ यांच्यावरील टीका उद्धटपणाची
ए. वाय. पाटील हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी निवडून आलेल्या जागांबाबत दावा करणे गैर नाही. मात्र, त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे उद्धटपणाचे आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून समरजीत घाटगे यांना हटवा, अशी मागणी त्यांच्याच पक्षातून झाली. अशांना पाटील यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.
सत्कार समारंभाला घोरपडेंना पाठवून द्या
राष्ट्रवादीचे सदस्य किती आलेत, याची खातरजमा करण्यासाठी ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांना पाठवून द्या. आम्ही त्यांना निमंत्रित करतो, असा टोलाही युवराज पाटील यांनी लगावला.