‘उत्तर’मधून राष्ट्रवादीतर्फे देवणे, खाडे, वालावलकर इच्छुक
By Admin | Updated: August 19, 2014 00:38 IST2014-08-19T00:29:09+5:302014-08-19T00:38:49+5:30
उद्या यादी प्रदेशकडे : जिल्हयातील दहा मतदारसंघांत २७ इच्छुक

‘उत्तर’मधून राष्ट्रवादीतर्फे देवणे, खाडे, वालावलकर इच्छुक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे २७ इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली
आहे. सर्वाधिक मागणी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून असून यामधून महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, माजी उपमहापौर संभाजी देवणे, मंजिरी वालावलकर यांच्यासह पाचजण इच्छुक आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. इच्छुकांकडून अधिकृत उमेदवारी मागणी करण्याचे आदेश पक्षाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातून विविध मतदारसंघांतून ४२ इच्छुकांनी अर्ज नेले होते. हे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.
आजअखेर दहा मतदारसंघांतून २७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून, तर सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी एक कागल व राधानगरी मतदारसंघातून दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
महाडिक यांची भूमिका सावध!
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे इच्छुकांकडून उमेदवारी मागणी अर्ज मागवण्यात आले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधून अर्ज नेले होते, पण आज सायंकाळी आठपर्यंत त्यांच्याकडून मागणी अर्ज दाखल केले नव्हते. उमेदवारीबाबत खासदार महाडिक यांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
संध्यादेवी, नंदातार्इंचा अर्ज मुंबईत?
चंदगड मतदारसंघातून संग्रामसिंह कुपेकर व मोहन कांबळे यांनी पक्षाचा मागणी अर्ज दाखल केला आहे, पण विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर व नंदाताई बाभूळकर यांनी आज सायंकाळपर्यंत पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आपला मागणी अर्ज दाखल केलेला नाही. त्या मुंबई येथे प्रदेश कार्यालयाकडे दाखल करणार असल्याचे समजते.
यांनी केली पक्षाकडे उमेदवारीची मागणी -
कागल- हसन मुश्रीफ
राधानगरी- के. पी. पाटील
शाहूवाडी- बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, रणवीरसिंग गायकवाड
शिरोळ- राजेंद्र पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धैर्यशील माने, अशोकराव माने.
इचलकरंजी - अशोकराव जांभळे, रवींद्र माने, मदन कारंडे.
चंदगड- संग्रामसिंह कुपेकर, मोहन कांबळे.
करवीर- धैर्यशील पाटील-कौलवकर, प्रदीप पाटील.
हातकणंगले- भास्करराव शेटे, अशोकराव माने, अनिल कांबळे.
कोल्हापूर उत्तर- आर. के. पोवार, संगीता खाडे, संभाजी देवणे, अशोकराव साळोखे, मंजिरी मदन वालावलकर.
कोल्हापूर दक्षिण - प्रताप कोंडेकर, टी. बी. पाटील, हेमंत पाटील.