राष्ट्रवादीने महामार्ग रोखला
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:05+5:302016-03-16T08:36:06+5:30
भुजबळांच्या अटकेचा निषेध : आंदोलक ताब्यात; पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतूक ठप्प

राष्ट्रवादीने महामार्ग रोखला
कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्ह कोल्हापुरात मंगळवारी पडसाद उमटले. तावडे हॉटेल येथील
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा निषेध केला.
सोमवारी (दि. १४) ‘इडी’ने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक केली. भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद राज्यात विविध ठिकाणी उमटले. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग रोखला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पूर्ववत वाहतूक सुरू झाली. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस व्हॅनमध्ये घातल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले, भाजप-शिवसेना सरकारने छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने अटकेची कारवाई केली आहे.या सरकारचा आम्ही निषेध करतो. या आंदोलनात माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, प्रदीप पाटील-भुयेकर, सुनील देसाई, नितीन पाटील, सुनील साळोखे, आप्पासाहेब धनवडे, हंबीरराव पाटील,जयकुमार शिंदे, दर्शन चव्हाण, संतोष धुमाळ, बाळासाहेब खैरे, निरंजन कदम, लाला जगताप, फिरोज सरगूर, सरस्वती रजपूत, हिराबाई म्हातुगडे, चंद्राबाई रावळ, आदींचा सहभाग होता.
छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात चक्क पेन्शनधारक महिलांना वेठीस धरले. ‘पेन्शन देतो,’ म्हणून त्यांना रणरणत्या उन्हात उपाशीपोटी बसविल्याच्या तक्रारी याच महिलांनी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पितळ उघडे पडले.
या आंदोलनात हुपरी (ता. हातकणंगले) येथील ४० ते ५० वयोवृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करून लगेच सुटका केली; पण यामुळे त्या चांगल्याच घाबरल्या होत्या.
‘पेन्शनसाठी आंदोलन असल्याचे सांगत सकाळी टेम्पोत भरून आम्हाला इथे आणले आहे. मात्र, हे आंदोलन वेगळेच असल्याचे पाहून संबंधित महिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.