मुटकलवाडीत साकारणार नवी देवराई
By Admin | Updated: June 8, 2016 00:20 IST2016-06-07T22:37:11+5:302016-06-08T00:20:01+5:30
व्हॉट्स अॅप ग्रुपचे विधायकतेला पाठबळ : चार दिवसांत ५0 झाडे, ५0 हजारांची देणगी जमा

मुटकलवाडीत साकारणार नवी देवराई
आंबा : मुटकलवाडी (ता. शाहूवाडी) येथील ग्रामदैवत मुटकेश्वरच्या टेकडीवर नव्या देवराईचा संकल्प निसर्गप्रेमींच्या पाठबळातून साकारत आहे. ग्रामस्थांचा श्रमसहभाग व निसर्गप्रेमींच्या वृक्ष देणगीतून ही देवराई तीन वर्षांत साकारेल. आंब्यातील निसर्गप्रेमी प्रमोद माळी यांच्या संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम होत आहे. ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानातून प्रेरणा घेत जलपुनर्भरणासाठी देवराईची उभारणी ही वेगळी पायवाट मळणारी ठरत आहे.पर्यावरणदिनी देवराईच्या संकल्पनेसाठी मुटकलवाडीतील ग्रामस्थांची बैठक घेऊन त्यांच्यात जागृती केली गेली. दरम्यान, माळी यांनी व्हॉट्स अॅपवरील ग्रुपना तीन वर्षांपुढील भारतीय प्रजातीची झाडे देणगी रूपाने देण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केलेच व केवळ मेसेजद्वारे चार दिवसांत पन्नास झाडे लागवडीसाठी पन्नास हजारांची देणगी जाहीर करून थेट माळी यांच्या बँक खात्यावर जमा केली. सोशल मीडियावरील या प्रतिसादाने संयोजकांतील उत्साह वाढला आहे. एकेकाळी मुटकलवाडीत चाळीस उंबरे असून, जंगलाने वेढलेली. तसेच दहा वर्षांपूर्वी गावात मुबलक पाणी होते; पण वेळीच घटती भूजल पातळी व वृक्षसंवधर्नाकडे लक्ष न दिल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. वाडी झाडीविना उजाड पडली आहे. पाण्यासाठी भटकंती करून पाणी मिळवावे लागत आहे. भविष्यातील पाणी संवर्धनासाठी वृक्षलागवडीबरोबर जलपुनर्भरण कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करून देवराईच्या उभारणीला प्रारंभ होत आहे. यावर्षी वृक्षारोपण, तर पुढील वर्षी याच देवराईत वेली व झुडुपांच्या लागवडीचे आणि जलपुनर्भरणाचे धोरण असल्याचे माळी यांनी मांडले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर व ग्रामस्थांचा सहभाग यामुळे अल्पवधीत देवराई उभारणीला प्रारंभ होत आहे. लावलेली झाडे श्रद्धेने जपली जावीत व टंचाईग्रस्त वस्तीत पाणीभरण व्हावे म्हणून मुटकेश्वराच्या टेकडीची निवड करण्यात आली.
१५ जूनला वृक्षलागवड
देवराई उभारणीचा प्रारंभ १५ जूनला वृक्षलागवडीने होत आहे. यामध्ये जांभूळ, आंबा, रतनगुंज, कुसूम, पांगारा, मूचकुंद, बहावा, हिरडा, बेहडा, ऊंडी, शाल्मली, कदंब, वड, पिंपळ, पिंपरन, नागचाफा, रूद्राक्ष, आदी प्रजातीच्या झाडे उपलब्ध केल्याचे ग्रामपंचायत सदस्य बाळू लाड यांनी सांगितले.
मोलाचा सहभाग
वृक्ष देणगीत क्षमा पालेकर (मुंबई) यांनी अकरा हजार, तर अमोल वाळिंबे (पूणे) यांनी सहा हजार, यांच्यासह मोनेरा फौंडेशन (आंबा), नेचर लव्हर्स ग्रुप (कोल्हापूर), शैलभ्रमर ग्रुप (कोल्हापूर), आंबा वाईल्ड लाईफ ग्रुप (पुणे), ट्रव्हेला टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा सहभाग मोलाचा आहे.