नाट्य संमेलन स्वागताध्यक्षपदी साठे
By Admin | Updated: January 23, 2015 00:54 IST2015-01-23T00:50:28+5:302015-01-23T00:54:50+5:30
सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना ज्यांची सन्माननीय उपस्थिती असते, ज्यांच्या असण्याने वातावरण प्रसन्न होते,

नाट्य संमेलन स्वागताध्यक्षपदी साठे
बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. अशोक साठे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. बेळगावातील संगीत, नाटक, व्याख्याने, शास्त्रीय नृत्य, परिसंवाद, चर्चासत्रे, अशा सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना ज्यांची सन्माननीय उपस्थिती असते, ज्यांच्या असण्याने वातावरण प्रसन्न होते, आजूबाजूचे लोक सहजतेचा अनुभव घेतात, असे बेळगावातील विलोभनीय, सर्वसमावेशक, जगन्मित्र व्यक्तिमत्त्व, नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून लाभल्याने सर्वांनाच आनंद होत आहे.डॉ. साठे यापेक्षा अशोक काका याच नावाने सुपरिचित असणाऱ्या डॉ. साठे यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९३० साली बेळगाव येथेच झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्युनिसिपार्टीच्या मराठी शाळा नंबर १ मध्ये झाले. पुढे पाचवी ते अकरावी (मॅट्रिक)पर्यंतचे शिक्षण सरदार्स हायस्कूलमध्ये झाले. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथूने इंटर सायन्स होऊन पुढे त्यांनी ग्रँट मेडिकल महाविद्यालय मुंबई येथून १९५३ साली ‘एमबीबीएस’ची पदवी संपादित केली. एप्रिल १९५४ पासून बेळगावमध्ये त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. २७ नोव्हेंबर १९५४ रोजी विवाह होऊन लताताई त्यांच्या सहचारिणी झाल्या.
क्रिकेट, टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन या सर्व खेळांत ते निष्णात आहेत. नाटक हा तर त्यांचा प्राण आहे. आजपर्यंत २५ नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या असून, अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ग्रँट मेडिकल महाविद्यालयात असताना पु. ल. देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बिचारे सौभद्र’ या नाटकातील भूमिकेपासून त्यांच्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात झाली. बेळगावमध्ये आल्यावर कै. बाप्पा शिरवईकरांच्या ‘कलोपासक’ या संस्थेतून त्यांच्या दिग्दर्शनाखाली श्रीमंत, पोरखेळ, अंमलदार, राणीचा बाग अशा अनेक नाटकांतून भूमिका केल्या. त्यानंतर वांगमय चर्चा मंडळाच्या अनेक संगीत नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन त्यांनी केले.